वृक्षारोपणावर चालविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:51 PM2018-08-22T21:51:08+5:302018-08-22T21:51:28+5:30

राखीव वन क्षेत्रातील वृक्षारोपणावर ट्रॅक्टर चालवून ५५५ रोपटी उद्ध्वस्त करून वनजमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न करण्याची घटना तालुक्यातील बोरगाव बुज. जंगलातील मेंढा शिवारात घडली. या प्रकरणी वनविभागाने दिलेल्या तक्रारीवरून अकरा जणांना अटक करण्यात आली.

Tractor run on tree plantation | वृक्षारोपणावर चालविला ट्रॅक्टर

वृक्षारोपणावर चालविला ट्रॅक्टर

Next
ठळक मुद्देअकरा जणांना अटक : राखीव वनक्षेत्राच्या मेंढा शिवारातील घटना, भारतीय राजमुद्रा गैरवापराचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राखीव वन क्षेत्रातील वृक्षारोपणावर ट्रॅक्टर चालवून ५५५ रोपटी उद्ध्वस्त करून वनजमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न करण्याची घटना तालुक्यातील बोरगाव बुज. जंगलातील मेंढा शिवारात घडली. या प्रकरणी वनविभागाने दिलेल्या तक्रारीवरून अकरा जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे अतिक्रमण करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी पोलिसांसारखा गणवेश घालून भारतीय राजमुद्रेचा गैरवापर केल्याचे वनविभागाने या तक्रारीत म्हटले आहे.
आसाराम वैद्य (६५), पंकज आसाराम वैद्य (२५) दोघे रा. मेंढा, हेमकृष्ण तेजराम उईके (३६) रा.कुंभली, केवळराम गुजर उईके (६७) रा.पिटेझरी, वसंत बळीराम इळपाते (६१) रा.ओकारा, जयलाल बळीराम नामुर्ते (३०) रा.एकोडी, दलिराम सदाशिव उईके (३६) रा.रावणवाडी, चैतराम किसन टेकाम (३६) रा.पिटेझरी, केशव शामराव मेश्राम (२८) रा.मकरधोकडा, सेवकराम डुकरू टेकाम (४७) रा.पिटेझरी, रेवनताई सुरेश वरखडे (५५) रा.पिटेझरी अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. वनविभागाच्या वतीने बोरगाव बुज. जंगलातील मेंढा शिवारात महिनाभरापूर्वी दहा हेक्टरवर वृक्षारोपण केले होते. या ठिकाणी ११ हजार १११ वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. वनविभागाच्या वतीने देखभाल करण्यात येत होती. त्याठिकाणी एका चौकीदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आसाराम वैद्य यांच्यासह काही जण ट्रॅक्टरसह या जंगलात पोहचले. आमची जमीन आहे असे म्हणत त्यांनी वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांची ट्रॅक्टरद्वारे चिखलणी सुरु केली. यात ५५५ रोपटी उध्वस्त झाली.
हा प्रकार माहित होताच वनचौकीदार त्या ठिकाणी पोहचला. त्याने याबाबत जाब विचारला असता आम्हाला सरकारने परवानगी दिली आहे. ही जागा आमची आहे असे म्हणत त्या चौकीदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. वनविभागाचे वनरक्षक आणि अधिकारी त्याठिकाणी पोहचले. त्यांनी या मंडळींना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मारण्याची धमकी दिली.
ही सर्व मंडळी पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून आणि त्यावर भारतीय राजमुद्रा लावून आलेले होते. या ठिकाणी त्यांनी चिखलणी करताना ‘वन, जल, जमीन हमारी है, उसपर हमारा अधिकार है’ अशा घोषणा दिल्या.
विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीही अतिक्रमणाचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी वनविभागाच्या वतीने कारधा पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. दरम्यान पुन्हा काल ही मंडळी मेंढा शिवारात पोहचली. त्यांनी तेथे गोंधळ घालत वृक्षारोपण नष्ट केले.
त्यावरून वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून भादंविच्या विविध कलमांसह भारतीय वनअधिनियम आणि भारतीय राजमुद्रा अयोग्य वापरास प्रतिबंध कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. कारधा पोलिसांनी या अकरा जणांना ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Tractor run on tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.