होळी सणाची परंपरागत घानमाकड झालीय पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:00 PM2019-03-20T22:00:29+5:302019-03-20T22:00:48+5:30
होळीची चाहूल लागली की ग्रामीण भागातील तरुणांची घानमाकड तयार करण्याची ओढ लागायची. पळसाचे विशिष्ट आकाराचे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे. गावातील चौकात घानमाकड बसवून त्यावर गरागरा फिरण्याचा आनंद घेतला जायचा. तीन दशकापूर्वी गावागावात दिसणारे दृश्य आता नामशेष झाले आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात घानमाकड लुप्त झाली असून नवी पिढी गरगर फिरण्याच्या आनंदाला मुकली आहे.
मुखरु बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : होळीची चाहूल लागली की ग्रामीण भागातील तरुणांची घानमाकड तयार करण्याची ओढ लागायची. पळसाचे विशिष्ट आकाराचे लाकूड आणून घानमाकड तयार करायचे. गावातील चौकात घानमाकड बसवून त्यावर गरागरा फिरण्याचा आनंद घेतला जायचा. तीन दशकापूर्वी गावागावात दिसणारे दृश्य आता नामशेष झाले आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात घानमाकड लुप्त झाली असून नवी पिढी गरगर फिरण्याच्या आनंदाला मुकली आहे.
होळी हा सण आला की, ग्रामीण भागातील तरुणाई उत्साहात दिसायची. शेणापासून चाकोल्या तयार करण्यापासून पळस फुल जंगलातून आणून रंग तयार करण्याची लगबग सुरु व्हायची. यासोबतच तरुणांच्या आवडीचा प्रकार म्हणजे घानमाकड होय. पळसाच्या झाडापासून तयार होणारी ही घानमाकड काही दशकापूर्वी तरुणांचा जीव की प्राण असायची. घानमाकड तयार करण्यासाठी सर्वप्रथम जंगलात जाऊन विशिष्ट आकाराचे पळसाचे झाड शोधायचे. व्ही आकाराची फांदी शोधून ती तोडली जायची. गावात आणल्यानंतर मैदानात घानमाकडसाठी खुंट रोवला जायचा. तर व्ही आकाराच्या लाकडाला मधोमध कोरून छिद्र तयार केले जायचे. रोवलेल्या खुंटावर आडवी व्ही आकाराची फांदी ठेवून त्यावर दोन्ही बाजूला बसून तिला एक सहकारी गरगरा फिरवायचे. हा प्रकार होळीच्या आठ दिवसांआधीपासून सुरु व्हायचा. होळीच्या दिवशी घानमाकड होळीमध्ये टाकली जायची. मात्र अलिकडे घानमाकड लुप्त झाली. तरुणाईचा हा निखळ आनंदही संपला.
निमगावच्या शिक्षकांनी सजवली घानमाकड
हसत खेळत ज्ञानार्जन व्हावे, नैसर्गिक आनंद मिळावा या हेतूने पारंपारिकतेचा आधार घेत लुप्त होत चाललेल्या घानमाकडीच्या खेळाला निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी पुनरुज्जीवन दिले. मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी घानमाकड तयार केली. शाळेच्या परिसरात ही घानमाकड लावून विद्यार्थ्यांना घानमाकडीवर बसण्याचा आनंद लुटता आला. यासाठी शिक्षक रामकृष्ण कमाने, विजय डाभरे, भास्कर गरपडे, शिक्षिका मीरा मोहतुरे यांनी सहकार्य केले. गत आठ दिवसांपासून ही घानमाकड सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र झाला आहे. यासाठी निमगावचे सरपंच रुपचंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनीही सहकार्य केले. आता विद्यार्थी घानमाकडीवर बसून आनंद लुटत आहेत.