आंतरराज्य बावनथडी पुलावरील वाहतूक पुन्हा केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:00 AM2021-05-05T05:00:00+5:302021-05-05T05:00:51+5:30
महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावांमध्ये जावे लागते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा बंद केली आहे. पुलावरील रस्ता व नाली खोदकाम करण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर कटंगी आंतरराज्य मार्गावर बावनथडी नदीवरील हादरे बसणाऱ्या पुलावरून दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होती; परंतु दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील रस्त्यावर नाली खोदकाम केले, त्यामुळे या वाहनांच्या वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. हलक्या वाहनांचा मार्ग बंद केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती एक वर्षापासून केली नाही. आंतरराज्य महामार्ग असूनही त्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले.
सदर प्रकरणात जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावांमध्ये जावे लागते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा बंद केली आहे. पुलावरील रस्ता व नाली खोदकाम करण्यात आले.
मागील सप्टेंबर महिन्यात जड वाहतुकीकरिता पूल बंद करण्यात आला होता. नागरिकांनी विरोध केल्यानंतर दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक येथे सुरू करण्यात आली होती. सदर वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. मागील एक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती केली नाही. संबंधित विभाग निविदा काढण्यात आल्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत आहे; परंतु आंतरराज्य महामार्ग मागील एक वर्षापासून बंद असल्यामुळे वाहतुकीला या ठिकाणी फटका बसत आहे.
किमान हलक्या वाहनांना येथे वाहतुकीला परवानगी देण्याची गरज आहे. वाहतूक बंदमुळे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरून फेरा मारून जावे लागते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या सोयीकरिता उन्हाळ्यात किमान नदी पात्रात तात्पुरता रपटा करण्याची गरज होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर समस्येवर जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.