अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यात वाहतूक ठप्प; घरांमध्ये पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 02:29 PM2019-09-06T14:29:45+5:302019-09-06T14:34:40+5:30
भंडारा तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी नाल्यावर पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. दुसरीकडे वैनगंगेच्या जलस्तरात वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे ३३ वक्रव्दार दीड मीटरने उघडण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मागील २४ तासापासून मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्हयातील चार मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. यात लाखांदूर ते वडसा, पवनी तालुक्यातील ढोरप या गावाशी संपर्क तुटला आहे. ढोरप येथील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले आहे. सदर ठिकाणातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सतर्कतेच्या दृष्टिकोनातून सदर ठिकाणी जिल्हा शोध व बचाव पथक पाठविण्यात आले आहे. भंडारा तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी नाल्यावर पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. दुसरीकडे वैनगंगेच्या जलस्तरात वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे ३३ वक्रव्दार दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. गोसे खुर्द प्रकल्पाचे 33 वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सराळी 10.30 वाजता 19 दरवाजे 1 मीटरने तर 14 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून पाच हजार सातशे साठ ( 5760 ) क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगा नदीचा जलस्तर वेगाने वाढत आहे. नदी काठालगतच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.