राष्ट्रीय महामार्गावर होतोय वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:18+5:302021-02-15T04:31:18+5:30
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे पथदिवे चालू झाल्याने नागपूर नाका ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत ...
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे पथदिवे चालू झाल्याने नागपूर नाका ते आरटीओ कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यासाठी मुजबी ते भिलेवाडापर्यंत उड्डाणपूल निर्मितीची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
दररोज दुपारी व सायंकाळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे अनेक दिवसांपासून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल निर्माण करण्याची गरज आहे. महामार्गावर उड्डाणपूल मंजूर झाला असला तरी अद्याप काम सुरू झाले नसल्याने दररोज वाहनधारक कसरतीचा सामना करीत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते.
येथून दुहेरी वाहतूक सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली रस्ता रुंदीकरणाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यापूर्वी अरुंद रस्त्यामुळे अपघात घडले आहेत. मात्र प्रशासनाला जाग येत नसल्याने आणखी किती बळी जायचे, असा प्रश्न सामान्य नागरिकांतून होत आहे.
त्यातच राष्ट्रीय महामार्गालगत अनेक विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका आणखीनच बळावला आहे. अनेक ट्रकचालक तसेच वाहनधारक फळे तसेच अन्य खरेदीसाठी आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. परिणामी पाठीमागून भरधाव येणारी वाहने अचानक थांबत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेकदा नागरिकांकडून मागणी असताना असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.
बॉक्स
वाहतूक पोलिसांवरही कामाचा ताण वाढला
अनेकदा वाहनधारकांसोबत वादविवाद होत आहेत. अनेक वाहनधारक पोलिसांनाही न जुमानता निघून जातात. अशा वेळी अतिवेगाने जाणाऱ्या या वाहनधारकांवर अंकुश ठेवण्यासाठी उड्डाणपूल निर्मितीची गरज आहे. एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. मात्र काही वाहनधारक कारवाईच्या भीतीने अतिवेगाने पळ काढण्याचा प्रयत्न करतात. वाहतुकीच्या सततच्या कोंडीमुळे वाहतूक पोलिसांच्या जिवालाही अपघाताचा धोका वाढला आहे.