कर्णकर्कश हॉर्न लावणारे व सतत हॉर्न वाजविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:48+5:302021-02-20T05:40:48+5:30
मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनांच्या हार्नची तीव्रता कमी डेसिबल असावी, हे ठरलेले आहे. मात्र, मार्केटमध्ये अतिशय कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न ...
मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनांच्या हार्नची तीव्रता कमी डेसिबल असावी, हे ठरलेले आहे. मात्र, मार्केटमध्ये अतिशय कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न उपलब्ध आहेत. बरेच जण चारचाकी किंवा मोठ्या ट्रकचा हॉर्न दुचाकीला लावतात. विशेष करून अल्पवयीन मुले व युवा वर्गांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात आपल्या वाहनांचे हॉर्न वाजवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे महाविद्यालय परिसर सायलेन्स झोन असूनही तेथे नियमांची सातत्याने पायमल्ली केली जात आहे. यावर कारवाईची प्रतीक्षा आहे
फटाके फोडणारे दुचाकीस्वार मोकाटच
काही विशिष्ट प्रकारच्या दुचाकींवर फटाके फोडणारे सायलेन्सर लावले जाते. यातून ठिणग्याही बाहेर पडतात. अशा दुचाकी अगदी दाटीवाटीने व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या परिसरात फिरवून दुचाकीस्वारांकडून फटाके फोडले जातात. अचानक जवळ येऊन प्रचंड आवाज आल्यानेही वाहनचालक घाबरून अपघात होण्याची भीती आहे. अनेक जण या फटाक्यांचा आवाज ऐकून कोसळले आहेत. मात्र, फटाके फोडणारे दुचाकीस्वार पोलीस कारवाईपासून दूर आहेत.
वर्षभरात १४१ जणांवर पोलिसांचा दंडुका
वाहतूक पोलिसांनी भंडारा शहरासह जिल्ह्यात कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या १४१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २८ हजार ४०० रुपयांचा दंडही वसूल केला. काही ठिकाणी पोलिसांनी असे हॉर्न काढून घेतले. पोलीस कारवाई झाल्याने काही काळ अशा वाहनचालकांकडून हॉर्नचा वापर केला जात नाही. मात्र नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यातील दंडाची रक्कम वाढविण्याची गरज आहे.
काय कारवाई होऊ शकते ?
मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनधारकांवर कारवाई केली जाते. पहिल्या तीनवेळा यामध्ये दंडात्मक कारवाई व सक्त ताकीद देण्याची तरतूद आहे. त्यापेक्षा जास्त वेळेस संबंधित वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांचा परवाना रद्दचीही कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना दिला आहे.
कोट
नियमात न बसणारे कर्णकर्कश हॉर्न असलेली वाहने, फटाके फोडणारे सायलेन्सर असलेली वाहने यावर मोटार वाहन कायद्यातील कलम ११९ प्रमाणे कारवाई करण्यात येते. येत्या काळात यासाठी अधिक प्रभावीपणे मोहीम राबविली जाणार आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली खपवून घेण्यात येणार नाही.
शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, भंडाराॉ