१५ दिवसात उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:44 AM2021-07-07T04:44:11+5:302021-07-07T04:44:11+5:30
रेल्वेचे काम शिल्लक; सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार ०६लोक०२ के तुमसर : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी रेल्वे ...
रेल्वेचे काम शिल्लक; सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार
०६लोक०२ के
तुमसर : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी रेल्वे उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होणार आहे. सुरुवातीला ट्रायल म्हणून वाहने धावणार आहेत. त्यानंतर या उड्डाणपुलावरून नियमित वाहने धावतील. सध्या रेल्वेचे तांत्रिक काम शिल्लक आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या उड्डाणपुलावरून नियमित वाहतूक सुरू होणार आहे. मागील पाच वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. कोरोनाकाळात उड्डाणपूल बांधकामाला फटका बसला होता.
मनसर-तुमसर-गोंदिया या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले. देव्हाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर उड्डाणपूल बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती. मागील पाच वर्षांपासून या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होते. मागील दीड ते दोन वर्षात अरुणा संक्रमण काळात उड्डाणपूल बांधकामाला त्याचा फटका बसला. परंतु रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले.
सध्या रेल्वेचे काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. यात उड्डाणपुलाखालून रेल्वेच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू गेल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेकरिता उड्डाणपुलावर लोखंडी जाळी बसविण्यात येणार आहे. ही जाळी येण्याची प्रतीक्षा रेल्वे करीत आहे. जाळी बसविल्यानंतर रेल्वे प्रशासन वाहतुकीला हिरवी झेंडी देणार असल्याची माहिती आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे तसेच रेल्वे प्रशासनाचेसुद्धा उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात येत आहे.
वाहून जाणाऱ्या राखेमुळे प्रश्नचिन्ह
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल हा दगडी असून, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला भरावात राख घालण्यात आली होती. बांधकाम सुरू असताना दगडातून राख मोठ्या प्रमाणात बाहेर निघाली. त्यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या पोच मार्गावर मोठे खड्डे पडले होते. ते खड्डे बुजवण्यात आले. पुलातून राख बाहेर का पडत आहे याकरिता सर्वांनी बांधकाम विभागाने तज्ज्ञांना पाचारण केले होते. येथे एक तज्ज्ञांचे पथक येऊन गेले; परंतु दुसर्या तज्ज्ञांचे पथक येथे अजूनपर्यंत आलेले नाही अशी माहिती आहे. पुलावरून वाहतूक सुरू करताना प्रथम काही दिवस वाहनाने ट्रायल म्हणून धावणार आहेत त्यानंतर नियमित वाहतूक उड्डाणपुलावरून सुरू होणार असल्याची माहिती आहे.
रेल्वेने केलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुरक्षेकरिता लोखंडी जाळी बसविण्याचे काम तेवढे शिल्लक आहे. जाळी बसविल्यानंतर रेल्वेकडून वाहतुकीला परवानगी देण्यात येणार आहे.
- शिव दत्त, स्थापत्य अभियंता, रेल्वे