माती वाहतूक कामात गैरव्यवहार!
By admin | Published: December 4, 2015 12:58 AM2015-12-04T00:58:03+5:302015-12-04T00:58:03+5:30
मोहाडी तालुक्यातील पालोरा ग्रामपंचायतीचे वतीने सन २०१५ मध्ये झालेल्या पाटील तलाव खोलीकरण व गाळ
पालोरा येथील प्रकार: माहिती अधिकारातून गैरव्यहार उघडकीस, चर्चेला उधाण
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा ग्रामपंचायतीचे वतीने सन २०१५ मध्ये झालेल्या पाटील तलाव खोलीकरण व गाळ वाहतुकीच्या कामात संगनमताने करण्यात आलेला घोटाळा माहिती अधिकारातून उघडकीस आलेला आहे. गाळ वाहतुकीच्या कामावर ट्रॅक्टर नसतांना कान्हळगावचे उपसरपंच दिगांबर कुकडे, त्यांचे वडील अंतीराम कुकडे तसेच रोहयो तांत्रीक अभियंता महेश निमजे यांचे लहान बंधू संजय निमजे यांचे नावे वाहतुकीचे ३८९ ट्रिपचे ६६,४८३ रुपयांची देयके संगनमताने मंजूर करण्यात आले. प्रत्यक्ष कामावर राबलेल्या ट्रॅक्टर चालक-मालकात असंतोष असून चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पालोरा ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१५ चे मे महिन्यात पाटील तलावातील गाळाचे खोदकाम करुन ट्रॅक्टरच्या सहायाने शेतकऱ्याचे शेतात वाहतूक करण्याचे काम हाती घेण्यात आले. रोहयो कामावर अकुशल कामासाठी जवळपास ५३० मजुर कार्यरत होते. तर गावातील १४ ट्रॅक्टर प्रत्यक्ष वाहतुकीचे कामावर लावले गेले होते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहचवून देण्यात आला. यासाठी ट्रॅक्टर चालक-मालकांना प्रती ट्रॅक्टर (ट्रीप) १७०.९१ प्रमाणे भाडे देण्यात आले. पंरतु यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गावाबाहेरील ट्रॅक्टर लावण्यात आलेले नव्हते. पाटील तलाव गट क्रमांक ११ मध्ये दोन आठवड्याचे काम झोले. पहिला आठवडा ७ ते १३ मे पर्यंत पूर्ण होऊन यामध्ये मस्टर क्रमांक ३०३८ ते ३०५७ यांचा समावेश होता. दुसऱ्या आठवड्याचे काम १४ ते २० मे दरम्यान झाले. यामध्ये मस्टर क्रमांक ३८१४, ३८३२, ३९५४ यांचा समावेश आहे. दोन्ही मस्टर दरम्यान कामावर नसतांना कान्हळगावचे उपसरपंच दिगांबर अंतीराम कुकडे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ एल १११३ च्या नावे ६५ ट्रीप, अंतीराम नागोजी कुकडे, ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ जी ९८५ च्या नावे ६५ ट्रीप तर रोहयो तांत्रीक अभियंता महेश निमजे यांचा लहान भाऊ संजय इस्ताक निमजे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ डी ९८९७ च्या नावे ७० ट्रिप असे एकूण २०० ट्रिपचे भाडे पहिल्या आठवड्यात दाखविले गेले. दुसऱ्या आठवड्यात दिगांबर कुकडे यांच्या नावे ६२, अंतीराम कुकडे यांचे नावे ६२ तर संजयच्या नावे ६५ ट्रिप असे एकुण १८९ ट्रिपचे भाडे दाखविण्यात आले. दोन्ही आठवड्या मिळून ३८९ ट्रिपचे १७०.९१ भाडे प्रमाणे ६६,४८३ रुपयांचे भाडे दाखविण्यात आले. सदर गैरप्रकार ग्रामपंचायत, अभियंता व रोजगार सेवक यांच्या संगणमताने करण्यात आला. (वार्ताहर)