रेल्वेगाड्या हळूहळू येत आहेत रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:15+5:302021-06-24T04:24:15+5:30
गोंदिया : मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेची प्रवासी वाहतूकसुद्धा ठप्प झाली होती. त्यानंतर काही ...
गोंदिया : मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेची प्रवासी वाहतूकसुद्धा ठप्प झाली होती. त्यानंतर काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र अजूनही रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने धावत नसून लोकल आणि पॅसेंजर गाड्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यातच आता रेल्वे विभागाने हळूहळू का होईना काही गाड्या सुरू करण्यास प्रारंभ केल्याने रेल्वे वाहतूक रुळावर येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
राज्यात सर्वत्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याने रेल्वे विभागानेसुद्धा काही मार्गांवर रेल्वेगाड्या सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. याचअंतर्गत ४ जुलैपासून शिवनाथ एक्स्प्रेस व इंटरसिटी एक्स्प्रेस या नियमित सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे नागपूर ते बिलासपूरला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या या मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण होत्या. आता ही गाडी नियमित सुरू होणार असल्याने नागपूरहून बिलासपूर आणि बिलासपूरहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. तर गोंदिया, रायपूर, भंडारा, दुर्ग, राजनांदगाव या रेल्वेस्थानकांवर या गाडीचे थांबे असल्याने तेथील प्रवाशांनासुद्धा दिलासा मिळाला आहे. १ जुलैपासून बऱ्याच रेल्वेगाड्या सुरू होण्याचे संकेत रेल्वे विभागाकडून दिले जात आहे.
गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट गाडीची प्रतीक्षा
मागील दीड वर्षापासून गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट या पॅसेजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच या मार्गावरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवाय त्यांना अतिरिक्त भुर्दंडसुद्धा सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.