सिंचन प्रकल्पाला हस्तांतरणाची आडकाठी
By admin | Published: April 20, 2015 12:40 AM2015-04-20T00:40:14+5:302015-04-20T00:40:14+5:30
महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतरणावरून दोन विभाग आमने सामने आली आहेत.
वीज पुरवठा खंडीतच : पाण्याचा उपसा थांबणार
चुल्हाड (सिहोरा) : महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतरणावरून दोन विभाग आमने सामने आली आहेत. या वादात तब्बल दिड महिन्यांपासून प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत असून जलकुंभातील गाळ उपसा करण्यात आलेला नाही. यामुळे येत्या पावसाळ्यात प्रकल्प नदी पात्रातून पाण्याचा उपसा करणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.
सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर आर शेती सिंचित करण्यासाठी ११० कोटी रूपये खर्चून बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. पावसाळ्यात हा प्रकल्प नदी पात्रातून पाण्याचा उपसा करित असून चांदपूर जलाशयात या पाण्याची साठवणूक करण्यात येत आहे.
या पाण्याची विल्हेवाट आणि वाटप करण्याची जबाबदारी लघु पाटबंधारे विभाग बजावित आहे. सध्या हा प्रकल्प तिरोडा उपसा सिंचन प्रकल्प यांच्या नियंत्रणात आहे. गोंदिया जिल्ह्यातून या प्रकल्प स्थळाचे नियोजन करण्यात येत आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाने या प्रकल्पस्थळात असणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी अद्याप पुढाकार घेतला आहे, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकल्पात असणाऱ्या समस्या निकाली काढताना भांडवली खर्चाचा आधार घेतला जात होता, परंतु नियंत्रण ठेवणाऱ्या तिरोडा उपसा सिंचन योजनेला निधी तथा आदेश मिळाले नसल्याने प्रकल्प स्थळातील समस्या निकाली काढण्यात आलेल्या नाहीत. या प्रकल्प स्थळात मार्च महिन्यापासून वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. ३६ हजार ४०० रूपयांची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल दीड महिन्या नंतरही वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. कोट्यवधींची महत्त्वाकांक्षी योजना अंधारात असताना लोकप्रतिनिधी दबाव निर्माण करित नाही. प्रकल्प स्थळात टाकीत गाड तयार झाली आहे. या टाकीमधून पंपगृहाला पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा उपसा करताना पंपगृह अडचणीत येत आहेत. जलाशयात साठवणूक पाण्याचे वाटप लघु पाटबंधारे विभाग करीत आहे. याच विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांवर पाणीपट्टी करांची आकारणी करून वसुली करीत आहे. हा निधी शासनाच्या तिजोरीत जमा होत आहे. परंतु वसुली करणारा लघु पाठबंधारे विभाग या प्रकल्प स्थळात असणाऱ्या समस्या निकाली काढत नाही. नियंत्रण ठेवणारा तिरोडा सिंचन योजना तिरोडा असून शेतकऱ्यांकडून वसूल करण्याचे अधिकार लघु पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहे. प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नसल्याने पाणी वाटप करताना संकट येणार आहे. आदेश नसल्याचे सांगून नियंत्रण ठेवणारा विभाग हात झटकत आहे तर प्रकल्पाचे हस्तांतरण झाले नसल्याने समस्या निकाली काढण्याचे निर्देश नाहीत, असे पाणी पट्टी करांची वसुली विभाग सांगत आहे. (वार्ताहर)
सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी असली तरी समस्या सोडविण्याचे आदेश प्राप्त झाले नाही. याशिवाय निधी नसल्याने वीज जोडणी पूर्ववत करण्यास विलंब लागत आहे.
पी. एन. लांजेवार,
उपविभागीय अभियंता,
उपसा सिंचन योजना, तिरोडा.