शिक्षकाची बदली करा नाहीतर आम्ही मुलांचे नाव काढू?
By admin | Published: January 6, 2017 12:52 AM2017-01-06T00:52:02+5:302017-01-06T00:52:02+5:30
शहरात ज्याप्रमाणे शिक्षणाला महत्व आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागातील गावागावात शिक्षण पोहचले आहे.
प्रकरण कमकाझरीचे : शिक्षकाच्या गैरहजेरीत पोषण आहार शिजविणारी बाई घेते प्रार्थना
विशाल रणदिवे अड्याळ
शहरात ज्याप्रमाणे शिक्षणाला महत्व आहे त्याप्रमाणे ग्रामीण भागातील गावागावात शिक्षण पोहचले आहे. अड्याळवरुन ८ किमी अंतरावर डोंगर पायथ्याशी कमकाझरी हे गाव आहे. शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे शाळा शासन तर आल्या पंरतु कमकाझरी खेडेगावातील या शाळेतील पटसंख्या टिकुन राहावी यासाठी ग्रामस्थांनी आपल्या नातेवाईकांची मुले तर काहीनी कान्व्हेंटमधुन मुलांची नावे काढून या शाळेत दाखल केले. महत्वाचे म्हणजे मागील काळात प्रगत शैक्षणिक धोरणांतर्गत ही शाळा पवनी तालुक्यात गुणांकणात दुसऱ्या क्रमांकावर होती. गावची लोकसंख्या २१० च्या आसपास, शाळेची पटसंख्या २० वर्ग १ ते ४ पर्यंत आहे. मे २०१६ पर्यंत शाळा व्यवस्थीत सुरु होती. मुलांचा अभ्यास, शिक्षण सर्व काही सुरळीत परंतु जेव्हापासून भंडारा तालुक्यातून शिक्षक आले तेव्हापासून या शाळेचे शिक्षण मागे पडले आहे. त्यासोबतच मुलांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, बौध्दीक व शारीरिक विकास खुंटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या शाळेची व्यवस्थापन समिती आक्रमक झाली आहे. या शाळेचे गेट कधीच वेळेवर उघडत नाही. शिक्षक वेळेवर येत नाही. आले तरी येथील विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून खाऊ घालणारी बाई या विद्यार्थ्यांची प्रार्थना घेते. कमी मानधनावर काम करणारी महिला जर ही कामे करत असेल तर मग हजारो रूपयांचे वेतन घेणाऱ्या शिक्षकांचा उपयोग कोणता, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
लक्ष्मण ईश्वरकर हे आधीपासुन आहेत यांच्या सोबतीला रोटके होते. रोटके यांच्या जागी भंडारा तालुक्यातून शिक्षक आले. ते शाळेत कमी आणि बाहेर जास्त राहत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे त्या शिक्षकाऐवजी दुसरा शिक्षक द्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती, शिक्षण अधिकारी, खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पवनी यांच्याकडे केली आहे. या मागणीवर कारवाई न झाल्यास शाळेतील २० ही विद्यार्थ्यांची टीसी काढण्याचा ईशारा कमकाझरी येथील पालकांनी दिला आहे.