गांधीगेट ते घोडेघाट रस्ता पालिकेला हस्तांतरित
By admin | Published: May 27, 2017 12:20 AM2017-05-27T00:20:29+5:302017-05-27T00:20:29+5:30
पवनीकडून भंडाराकडे जाणारा बाह्यमार्ग नसताना २९-३० वर्षापूर्वीपासून गांधीगेट ते घोडेघाट वैनगंगा नदीपर्यंतचा रस्ता राज्यमार्ग म्हणून अस्तित्वात होता.
पवनी येथील प्रकार : गावातील बार व देशी दारु दुकानासाठी घेतला निर्णय
अशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पवनीकडून भंडाराकडे जाणारा बाह्यमार्ग नसताना २९-३० वर्षापूर्वीपासून गांधीगेट ते घोडेघाट वैनगंगा नदीपर्यंतचा रस्ता राज्यमार्ग म्हणून अस्तित्वात होता. न्यायालयाने राज्य मार्गालगतचे दारुची दुकाने व बार बंद करण्याचे आदेश निर्गमित केले व राज्यातील पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. गावातील रस्ते नगर पालिकेला हस्तांतरीत व्हावे यासाठी ठराव संमत होऊ लागले.
पवनी नगर पालिकेने ठराव करुन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. त्याअनुषंगाने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधी गेट ते घोडेघाट राज्यमहामार्ग १.६०० किमी अवर्गीकृत करुन पवनी नगर परिषदेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णर्यामुळे रस्त्याची देखभाल दुरुस्तीचा खर्च नगर परिषदेला करावा लागणार आहे. मात्र रस्ता हस्तांतरणाचा फायदा गावातील देशी दारुची दुकाने व बार मालकांना होणार आहे.
शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या प्रस्ताव ९ मार्च २००१ चा शासन निर्णयातील टिप ५ मधील तरतुदीचा विचार करुन १७ वर्षानंतर पालीकेने रस्त्याची मागणी केली व शासनाने रस्ता अवर्गीकृत करण्याच निर्णय घेतला. या निर्णयामुळे गांधीगेट ते घोडेघाट वैनगंगा नदीपर्यंतचा १.६०० किमी लांबीचा रस्ता नगर पालिकेला हस्तांतरीत झाला आहे. या मार्गावरील दोन बार व दोन देशी दारुची दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. ते सुरु होण्याची शक्यता बळावली आहे. सद्यास्थितीत बाह्य मार्गावर असलेले अनेक बार व देशी दारुची दुकाने पवनी नगरात सुरक्षित जागा शोधून वाढलेली आहे. पवनीत पुन्हा एकदा दारुचा महापूर सुरु होणार आहे. सद्यास्थितीत पवनी नगरात एकमेव बार सुरु असल्याने त्या परिसरात दैनंदिन जत्रा भरते ती जत्रा आता अल्पावधित विभागली जाण्याची शक्यता आहे.