पोलीस बंदोबस्तात शिक्षकांच्या बदल्या

By admin | Published: May 13, 2016 12:21 AM2016-05-13T00:21:08+5:302016-05-13T00:21:08+5:30

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाच्या बदल्यांचे सत्र ६ ते १३ मे या कालावधीत राबविण्यात येत आहे.

Transfers in police constables | पोलीस बंदोबस्तात शिक्षकांच्या बदल्या

पोलीस बंदोबस्तात शिक्षकांच्या बदल्या

Next

जि.प. प्रशासनाचे नियोजन बारगळले : उन्हाच्या काहिलीने शिक्षकांचे बेहाल, संघटनांनीच केली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाच्या बदल्यांचे सत्र ६ ते १३ मे या कालावधीत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांच्या बदली सत्राला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. ही बदली प्रक्रिया कार्यशाळा जिल्हा परिषद प्रशासनाने तीन दिवस राबविण्याचे ठरविले आहे. मात्र या कार्यशाळेसाठी बोलविण्यात आलेल्या शिक्षकांची गैरसोय झाली. याउलट पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्तात ही बदली प्रक्रिया राबविण्यात आल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षक, केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षकांच्या बदल्या या कार्यशाळेतून करण्याचे नियोजन शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजित केले.
जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना एकाच शाळेत अनेक वर्षाचा कालावधी लोटला आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे मे महिन्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी ही कार्यशाळा राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नक्षलप्रभावित साकोली, लाखनी, लाखांदूर क्षेत्रातील शिक्षकांसह अन्य शिक्षकांच्याही या कार्यशाळेतून बदल्या करण्यात येत आहे. काही शिक्षकांनी समायोजनातून बदली करण्याची विनवनी शिक्षण विभागकडे केली आहे तर काही शिक्षकांनी सेवाज्येष्ठतेनुसार बदली प्रक्रिया राबविण्याची मागणी केली.
बुधवारला पार पडलेल्या कार्यशाळेत केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या बदल्या कार्यक्रम घेण्यात आला. गुरूवारला इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या सहायक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया राबविण्यात आली. शुक्रवारला पदवीधर शिक्षकांना या कार्यशाळेतून बदल्याच्या ठिकाणी पाठविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना एकाचवेळी पाचारण केले. त्यामुळे बुधवार व गुरूवारी या कार्यशाळेसाठी शिक्षकांची रीघ लागली होती. रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची प्रतिनियुक्ती किंवा बदल प्रक्रिया पूर्ण करण्याहेतूने काही शिक्षकांना बोलावूनही ही कार्यशाळा आटोपती घेता आली असती. मात्र शिक्षण विभागाने सरसकट जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना भंडारा जिल्हा परिषद येथे बोलाविले. त्यामुळे सर्वांची एकच भाऊगर्दी दिसली. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यशाळेसाठी येणाऱ्या शिक्षकांची व्यवस्था केली असल्याने बाहेरगावावरून आलेल्या शिक्षकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. (शहर प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेचा नियोजनाचा अभाव
उन्हाची प्रखरता असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने बाहेरगावावरून येणाऱ्या शिक्षकांसाठी व्यवस्था केली नव्हती. प्रखर उन्हात हे शिक्षक झाडांच्या आडोशाला उभे राहून या प्रक्रियेत सहभागी झाले होते. ही बाब हेरून शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या आवारात कापडी मंडप टाकला व शिक्षकांसाठी पिण्याचे थंड पाणी व शितपेयाची व्यवस्था केली होती.
पोलिसांच्या बंदोबस्तात बदल्या
जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. तीन दिवसीय कार्यशाळेतून शिक्षकांच्या बदल्या होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बदली प्रक्रिया पोलिसांच्या बंदोबस्तात राबविण्यात आली. त्यामुळे शिक्षकांच्या बदलीसाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवल्याने शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली होती.

निश्चित टक्केवारीपेक्षा अधिकच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी गरज नसतानाही शिक्षक देण्यात आले आहे. शिक्षकांच्या समस्यांसाठी संघटना लढा देत असल्यामुळे त्याचा बदला घेण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे. पोलीस बंदोबस्तातील या प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो.
- मुबारक सय्यद,
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

नियमाप्रमाणे २ मे रोजी यादी प्रसिद्ध करावयाची होती. ही यादी वेळेवर लावण्यात आली. या यादीत वरिष्ठाला कनिष्ठ तर कनिष्ठाला वरिष्ठ दाखविण्यात आले आहे. याद्या अद्ययावत करण्याची सीईओंना विनंती केली होती. या बदली प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय झाल्यास आयुुक्त, न्यायालयात दाद मागू.
- रमेश सिंगनजुडे,
जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ.

Web Title: Transfers in police constables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.