राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:38 AM2021-09-21T04:38:55+5:302021-09-21T04:38:55+5:30

गत अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या आणि वारंवार वेगवेगळ्या समित्या मागून समित्या स्थापन करण्यात आल्या. आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ...

Transfers of Zilla Parishad teachers across the state postponed again | राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या पुन्हा लांबणीवर

राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या पुन्हा लांबणीवर

Next

गत अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या आणि वारंवार वेगवेगळ्या समित्या मागून समित्या स्थापन करण्यात आल्या. आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेत ज्या संगणकप्रणालीद्वारे बदल्या होणार आहे, त्या संगणकप्रणालीचे म्हणजेच सॉफ्टवेअर डिझाइनसाठी १४ सप्टेंबरला ग्रामविकास विभागाने निविदा बोलावल्या आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष्य प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली इतर चार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती.

यासमितीमार्फत शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण ठरवले होते. आयुष्य प्रसाद यांच्या समितीने विभागवार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी बदल्या संदर्भात चर्चा करून लवकरच हा अहवाल शासनाला सादर करून बदल्या संदर्भात निर्णय होईल, असे सांगितले होते. त्यानंतर अभ्यास गटाने आपला अहवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना सादर केला. तो अहवाल सादर होऊन अनेक महिने लोटले. त्यानंतर ऑनलाइनच बदल्या करण्याचा शासन निर्णय आला. परंतु ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय घेतला असला तरी बदली सॉफ्टवेअर काही तयार झाले नाही. मध्यंतरी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांची बदली धोरण समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर एक पत्र काढून शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या होतील असे सांगितले होते. आता १४ सप्टेंबरला बदली सॉफ्टवेअरच्या टेंडरसाठी निविदा काढण्यात आल्याने, सत्र संपल्यानंतरच बदल्या होतील असे चित्र आहे.

बॉक्स

शासनाचे तळ्यात-मळ्यात धोरण !

२३ व २४ ऑगस्टला शिक्षक सहकार संघटनेचे शिष्टमंडळ राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभागाला भेटले. ग्रामविकास मंत्री यांची मंत्रालयात भेट घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या त्वरित कराव्या, अशी मागणी केली होती. परंतु बदल्यांचे सॉफ्टवेअरच तयार नसल्याचे सत्य समोर आले. बदल्या शासन निर्णय येऊन अनेक महिने झाले तरी बदल्या करणारे सॉफ्टवेअर अद्याप तयार नाही. तसेच ते कोणाला तयार करायला द्यायचे, याबाबात निर्णयच झाला नसल्याचे समोर आले आहे. याचमुळे शासनाचे तळ्यात मळ्यात धोरण सुरू आहे.

कोट बॉक्स

वारंवार स्थगित होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यामुळे अनेक वर्षे आंतरजिल्हा बदलीपासून वंचित असलेल्या व गैरसोयीच्या बदल्या झालेल्या शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने लवकरच निर्णय घेऊन ऑनलाइन बदल्या दिवाळीमध्ये तरी कराव्यात, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

-रवि उगलमुगले,

सदस्य, राज्य कार्यकारी शिक्षक सहकार संघटना

Web Title: Transfers of Zilla Parishad teachers across the state postponed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.