ट्रान्सफर्मर जळाला,धानपीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:38+5:302021-04-17T04:35:38+5:30
परसवाडा सिहोरा या गावाजवळील शेतशिवारात शेतीला पाणी देणाऱ्या वीजवाहिनी आहेत. वीजवाहिनीला वीज पुरवठा करणाऱ्या शेतशिवारातील ट्रान्सफार्मर गत तीन दिवसापासून ...
परसवाडा सिहोरा या गावाजवळील शेतशिवारात शेतीला पाणी देणाऱ्या वीजवाहिनी आहेत. वीजवाहिनीला वीज पुरवठा करणाऱ्या शेतशिवारातील ट्रान्सफार्मर गत तीन दिवसापासून बंद आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी माहिती घेतली असता, त्यात सुरुवातीला तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. बुधवारी तो कायमस्वरूपी बंद पडला. त्यानंतर सिहोरा येथील अभियंत्यांशी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी संपर्क साधल्यावर त्यांनी ट्रान्सफार्मर जळाला, अशी माहिती दिली. सदर ट्रान्सफार्मर बदलण्याकरिता आठ दिवस लागणार असल्याचे सांगितले.
मागील हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्या नुकसानाची भरपाई भरून काढण्याकरिता परसवाडा शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली. सध्या धान निसावण्याच्या मार्गावर असून त्याकरिता पाण्याची नितांत गरज आहे. मागील तीन दिवसापासून शेतामध्ये पाणी नसल्याने धान पिकाने माना खाली घातल्या आहेत. पुन्हा चार दिवस इथे ट्रान्सफार्मर न लागल्यास संपूर्ण धानपीक वाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन उन्हाळी धानपीक लावले. परंतु वेळेवर तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा बंद पडला. वितरण कंपनीने याची दखल घेऊन तात्काळ ट्रान्सफार्मर लावण्याची मागणी हिरालाल नागपुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.