तुमसरात गांजा विकणारी परप्रांतिय टोळी सक्रीय
By admin | Published: January 6, 2017 12:54 AM2017-01-06T00:54:06+5:302017-01-06T00:54:06+5:30
तुमसर शहरात मादक पदार्थ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती आहे. परप्रांतीय हा गांजा विक्री करीत आहेत.
अंमली पदार्थाच्या विळख्यात तरूण
तुमसर : तुमसर शहरात मादक पदार्थ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती आहे. परप्रांतीय हा गांजा विक्री करीत आहेत. विशेषत: बिहार राज्यातील युवक शहराच्या एका टोकावर हा गांजा विक्री करीत आहेत. याबाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ दिसत आहे.
शहरात मादक पदार्थ गांजा विक्री करणे सुरू आहे. देव्हाडी मार्गावर तलाव परिसरात युवकांची टोळी यात सक्रीय आहे. बिहार राज्यातून तुमसर शहरात गांजाची खेप येत असल्याची माहिती आहे. गांजा विक्री करणारे बिहार राज्याचे रहिवाशी असल्याचे समजते.
तुमसर शहरात हा गांजा रेल्वेने मागाने येत असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रवाशी गाडीत हा अंमली पदार्थ सुरक्षित येथे आणला जातो. दर आठवड्याला येथे गांजाची खेप येते. तुमसर मुख्य केंद्र असून येथून तो भंडारा, बालाघाट व नागपूरपर्यंत जात असल्याची माहिती आहे.
देव्हाडी मार्ग हा गर्दीचा रस्ता आहे. गांजा विक्री करणारी टोळी चारचाकी बसून गांजा विक्री करीत असल्याचे समजते. या परिसरापासून तुमसर पोलीस स्टेशन केवळ १०० ते १५० मीटर अंतरावर आहे. पोलीस विभागात गोपनीय खाते आहे. हा गोपनिय विभाग काय करतो हा मुख्य प्रश्न आहे. तलाव परिसराजवळच शाळा आहेत. त्यामुळे अंमली पदार्थाची विक्री नेमकी कुणाला केली जाते हा संशोधनाचा विषय आहे. अंमलीपदार्थाच्या विळख्यात येथील युवक तर गेले नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. गांजा विक्री करणारी टोळी धोकादायक असल्याने त्याबाबत कुणीच बोलायला पुढे येत नाही. ही शोकांतिका असून पोलिसांनी येथे सक्रीय राहुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)