उभ्या ट्रकवर भरधाव ट्रॅव्हल्स आदळली; दोघे ठार, आठ जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 01:05 PM2022-07-15T13:05:05+5:302022-07-15T13:08:38+5:30
या अपघाताने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
साकोली (भंडारा) : रस्त्याच्या कडेला नादुरुस्त स्थितीत उभा असलेल्या ट्रकवर भरधाव ट्रॅव्हल्स आदळून झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक व वाहक जागीच ठार, तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगलात गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडला. या अपघाताने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
टिकेंद्रकुमार चंदुलाल चंद्राकार (३६) रा. कालाभाटापार, जि. छत्तीसगड आणि पुष्पांजली रुपकुमार शर्मा (५४) रा. शंकरनगर रायपूर असे मृत चालक व वाहकाचे नाव आहे. तर केशव चंद्रकार, तितकला वर्मा, कुसुमलता चंद्रकार, ब्राम्हणी चंद्रकार, रुद्रा साहू, दीपा चंद्रकार, रितू वर्मा, प्रिया चंद्रकार अशी जखमींची नावे आहेत. जखमींना साकोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोहघाटा जंगलात नादुरुस्त ट्रक (ओडी ०५ बीबी १०५५) रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी रायपूरकडून येणारी भरधाव ट्रॅव्हल्स (सीजी ०८ एएस ०८९१) ट्रकवर आदळली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्सच्या केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. यात टिकेंद्रकुमार आणि पुष्पांजली हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व साकोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर महामार्गावर चार किलोमीटर रांग
मोहघाटा जंगलात राष्ट्रीय मार्ग दुपदरी असून येथे पहाटे ५.३० वाजता अपघात झाल्यानंतर दोन्ही बाजूला वाहनांची चार किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. अरुंद महामार्गामुळे या परिसरात नेहमीच अपघात होत असतात.