लाकूड माफियांकडून वृक्षतोड जोमात

By admin | Published: June 23, 2017 12:23 AM2017-06-23T00:23:19+5:302017-06-23T00:23:19+5:30

संपूर्ण राज्यात ४ कोटी वृक्षलागवडीची धडपड सुरू असताना भंडारा जिल्ह्यात मात्र अपरिपक्व व पूर्णवाढ झालेल्या वृक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे.

Tree plantation by wood mafia | लाकूड माफियांकडून वृक्षतोड जोमात

लाकूड माफियांकडून वृक्षतोड जोमात

Next

भंडारा जिल्ह्यात विदारक स्थिती : विनापरवाना झाडांची कत्तल, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण राज्यात ४ कोटी वृक्षलागवडीची धडपड सुरू असताना भंडारा जिल्ह्यात मात्र अपरिपक्व व पूर्णवाढ झालेल्या वृक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. वृक्ष कापण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी कापलेल्या लाकडांचा खच पडून असला तरी वन विभागाचे याकडे अजिबात लक्ष नाही.
खासगी शेतजमिनीवरील झाडे कापण्यासाठी वन विभागाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक असते. वन विभागाच्या भाषेत त्याला खसरा प्रकरण असे म्हणतात. त्यासाठी शेतीच्या सातबारासह विविध कागदोपत्री कारवाई केल्यानंतर खसरा प्रकरण मंजूर होऊन झाड कापण्याची परवानगी दिली जाते.
भंडारा वन विभागात एकूण १० वनपरिक्षेत्र आहेत. या सर्वच वनपरिक्षेत्रातून कापणीसाठी मंजूर झालेल्या झालेल्या झाडांव्यतिरिक्त जंगलातील झाडे कापून त्या झाडांमध्ये मिसळविले जातात. व झाडे नियमानुसार कापल्याचे सांगण्यात येते. भंडारा वनक्षेत्रातील सातोना, दाभा, मोहदूरा, टवेपार, तुमसर वनक्षेत्रातील करडी, मुंढरी, मोहगाव देवी, लेंडेझरी वनक्षेत्रातील रोंघा यासह सर्वच वनक्षेत्रात बेसुमार झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या झाडांना एका ठिकाणी रचून नंतर त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील शेतात असलेल्या एकूण झाडांचा विचार केल्यास रचून ठेवलेल्या झाडांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे ती झाडे जंगलातून नियमबाह्यरित्या तोडल्या गेली आहेत, ही बाब स्पष्ट होते. दरम्यान, हा प्रकार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित असतानाही वन विभागाने कोणतीही हालचाल केलेली नाही. कापण्यात आलेल्या झाडांमध्ये सागवान, आंबा, निम, अंजन, मोह, बोरी, किन्ही यासह अन्य महत्वाच्या व आडजात झाडांचा समावेश आहे. अपरीपक्व झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे. खसराधारक अनेक असताना एकाच्याच नावाने खसरा बनविण्यात येत आहेत.

७ लाख ६८ हजार रोपांची लागवड
भंडारा जिल्ह्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ७ लाख ६८ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या अभियानात लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर राहणार असून फक्त एक झाड लावा व वसुंधरेचे पाईक व्हा, असे आवाहन वनविभागाने केले आहे. तर याच जिल्ह्यात लाकुड माफियांनी वन कर्मचाऱ्यांशी संधान साधून झाडांची प्रचंड तोड केल्याचे पुढे आले आहे. एकीकडे झाडे लावायचे आणि दुसरीकडे पूर्ण वाढ झालेल्या झाडांची कत्तल करायची, असा प्रकार भंडारा वन विभागात सुरू आहे.

दुर्लक्षित धोरण
भंडारा जिल्ह्यात वृक्षतोड जोमात सुरू असले तरी कारवाई मात्र नगन्य आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतशिवारातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. खसऱ्याच्या नावाखाली ही वृक्षकटाई असली तरी नियमबाह्यपणे कामे केली जात असल्याची ओरड वृक्षपे्रमींनी केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

Web Title: Tree plantation by wood mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.