वृक्ष लागवड ही भविष्यात लोकचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 09:59 PM2018-07-01T21:59:16+5:302018-07-01T21:59:58+5:30
मनुष्याला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी व शुध्द पर्यावरणाची आवश्यकता असते. जे झाडामुळे आपणास मिळते. झाडे व जंगल असल्यामुळे पर्यावरण संतुलित राहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मनुष्याला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी व शुध्द पर्यावरणाची आवश्यकता असते. जे झाडामुळे आपणास मिळते. झाडे व जंगल असल्यामुळे पर्यावरण संतुलित राहते. म्हणून प्रत्येकानी आपल्या घरासभोवताल प्रत्येकी २ झाडे लावण्याचा निर्धार करावा व वृक्ष लागवडीस लोकचळवळीचे स्वरुप दयावे, असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
जिल्हयातील १३ कोटी वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम खांब तलाव भंडारा येथे आज अॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी शांतनू गोयल, पोलीस अधिक्षक विनीता साहू, उपवन संरक्षक विवेक होशिंग, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, तहसिलदार संजय पवार, जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अधिकारी आर.एन. दिघे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक विधाते, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शांतनू गोयल म्हणाले की, जिल्हयाचा वृक्ष लागवडीचा उद्दिष्टय २४.५८ लाख असून १ ते ३१ जुलै पर्यंत या उद्दिष्टयापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात येईल. जिल्हयातील सर्व तालुक्यात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करावी व त्यात नागरिकांचा सहभाग घ्यावा. वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सुध्दा वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, असे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक विनीता साहू म्हणाल्या की, घरोघरी वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करा. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज झाली आहे. नगरपरिषदेला २ हजार ५०० उद्दिष्टय दिलेले असून यावर्षी ३ हजार ५०० झाडे शहरात लावण्यात येणार आहे. भंडारावासियांनी या वृक्ष चळवळीस सहकार्य करुन भंडारा शहर हिरवेगार करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केले. प्रास्ताविकात उपवन संरक्षक विवेक होशिंग यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीबाबत माहिती दिली. तसेच जिल्हयाला दिलेल्या उद्ष्टिांपेक्षा जास्त वृक्ष लावण्याचा नागरिकांनी संकल्प करावा, असे सांगितले. जिल्हयात सर्व तालुक्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रमास उर्त्स्फूत प्रतिसाद लाभत असून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, खाजगी स्वयंसेवी संस्था, खाजगी उद्योग सर्वत्र वृक्ष लागवड जोमाने सुरु असून वृक्ष लागवडीस लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
संचालन व उपस्थिताचे आभार नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी प्रवीण पडोळे यांनी केले.