वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:36 PM2019-07-01T23:36:51+5:302019-07-01T23:37:11+5:30
शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
पवनी तालुक्यातील ईटगाव येथे सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक विवेक कोशिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी नूतन सावंत, सामाजिक वनिकरणाचे विभागीय अधिकारी आर.एन. विधाते, सहायक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनम ढोले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता संजीव जगताप, सरपंच गुलचंद बांते, माणिक मरकाम, राजुराचे सरपंच शंकर मडावी, ग्रीन हेरिटेज संस्थेचे मोहम्मद शहीद शेख, शाहीद खान, पी.आर. बीडीकर, देवतारे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अतिथींनी वृक्ष लागवडीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वृक्ष लागवड मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता. ही मोहिम महिनाभर चालणार आहे.
५४ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५३ लाख ९९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात सर्वात मोठा वाटा वनविभागाकडे आहे. यात वृक्ष लागवडीसाठी सहा हजार २७ साईटची नोंदणी करण्यात आली आहे. यात सर्व प्रशासकीय विभागाने ५७ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन तयार केले असून यासाठी ५० लाख खड्डे खोदण्यात आली आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभाग व इतर शासकीय, प्रशासकीय विभाग म्हणून उद्दीष्ट पूर्ण करणार आहे. यात सार्वजनिक उपक्रमांतर्गत नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे