खडदगाव-पिंपळगाव राजा क्षेत्रावरील झाडे गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:12 PM2019-03-23T13:12:46+5:302019-03-23T13:13:04+5:30

खामगाव : नांदुरा तालुक्यातील खडदगाव क्षेत्रावरील हजारो झाडं गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र, वृक्ष लागवड न करताच देयक काढण्यात आल्याने, या ठिकाणी हजारो झाडं गायब झाल्याची चर्चा आहे.

Trees disappears in Khaddgaon-Pimpalgaon area | खडदगाव-पिंपळगाव राजा क्षेत्रावरील झाडे गायब!

खडदगाव-पिंपळगाव राजा क्षेत्रावरील झाडे गायब!

Next

- अनिल गवई

खामगाव : नांदुरा तालुक्यातील खडदगाव क्षेत्रावरील हजारो झाडं गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र, वृक्ष लागवड न करताच देयक काढण्यात आल्याने, या ठिकाणी हजारो झाडं गायब झाल्याची चर्चा आहे. तर लावलेल्या  झाडांची योग्य निगा राखली गेली नाही. त्यामुळे काही मोजक्या झाडांच्या फांद्यांचे अवशेष याठिकाणी शिल्लक असल्याचे दिसून येते.

वृक्ष लागवड आणि संवर्धनावर शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केल्या जातो. पर्यावरण रक्षणासाठी विविध योजना अंमलात आणल्या जातात. यासाठी सामाजिक वनीकरणाकडून सामाजिक संघटना आणि इतरांची मदतही घेतली जाते. मात्र, प्रत्यक्षात वृक्षांची लागवड आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी असेल्या सामाजिक वनीकरण विभागाकडूनच शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. नांदुरा तालुक्यातील विविध क्षेत्रावरील वृक्ष लागवडीचा घोळ चव्हाट्यावर आला असतानाच, याच तालुक्यातील खडदगाव-पिंपळगाव राजा क्षेत्रावरील हजारो गायब झाली आहेत. तर लावलेली काही मोजकी झाडंही जगविण्यात सामाजिक वनीकरण विभागाला अपयश आल्याचे दिसून येते.  वरिष्ठांची मर्जी संपादन करून याठिकाणी मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. परिणामी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेचा संपूर्ण नांदुरा तालुक्यात बोजवारा उडाल्याचे दिसून येते. 

 

पाण्याच्या पैशांवरही डल्ला!

खडदगाव- पिंपळगाव राजा रस्त्यावर दुतर्फा कागदोपत्री झाडं लावून शासन निधीचा अपहार करण्यात आला. त्याचप्रमाणे कागदोपत्री लावलेली झाडं जगविण्यासाठी पाणी आणि इतर देखभालीसाठी मोठ्याप्रमाणात देयकं काढण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी संगनमताने हा घोळ केल्याची चर्चा आहे. सामुहिक भ्रष्टाचारातून शासनाला लक्षावधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची चर्चा आहे.


साईटवरील वनमजूर गायब!

खड्ड्यांमध्ये चांगली गाळाची माती, शेणखत आणि तत्सम बाबींसाठीही खर्च करण्यात आला. तरीही या रस्त्यावरील हजारो झाडं जगली नाहीत. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, नांदुरा तालुक्यातील विविध क्षेत्रावर एका पाठोपाठ एक भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याने, काही साईटवरील वनमजूर गायब असल्याचे समजते. 

  धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता!

खडदगाव क्षेत्रावरील वृक्षलागवडीसंदर्भात तसेच इतर क्षेत्रावर ताबडतोब पंचनामा केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.  मात्र, वनरक्षकाच्या पुढाकारातून झालेल्या घोटाळ्याला वन क्षेत्रपालांचे संरक्षण आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठांचेही यामध्ये हात ओले झाले. वरिष्ठांनाही त्यांना याघोळातील ‘वाटा’ मिळाल्याचा तक्रार कर्त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या क्षेत्रांचा ताबडतोब पंचनामा करण्याची मागणीही जोर धरत आहे.

 

खडदगाव क्षेत्रावरील वृक्ष लागवडीची  पाहणी केली जाईल. आताच यासंदर्भात काही सांगता येणार नाही.  त्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल.

    - एस.के.काळुसे, वन परिक्षेत्र अधिकारी, नांदुरा/ मलकापूर 
 

Web Title: Trees disappears in Khaddgaon-Pimpalgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.