मुरुम खनन करताना वृक्षांचे झाले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:42 PM2017-12-05T23:42:54+5:302017-12-05T23:43:30+5:30
घाटी तलावात मुरुम खनन करताना तलाव काठावरील वृक्षांना धोका पोहचला. यासंदर्भात तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी मंगळवारला मोका चौकशी व पाहणी केली.
मोहन भोयर।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : घाटी तलावात मुरुम खनन करताना तलाव काठावरील वृक्षांना धोका पोहचला. यासंदर्भात तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी मंगळवारला मोका चौकशी व पाहणी केली. तलाव काठावरील पळस व सीता वृक्ष खाली पडलेले दिसले. चौकशीचा अहवाल वनविभागाने मंगळवारी तुमसर तहसीलदारांना सादर केला. महसूल विभागाचे अधिकारी घाटी तलावाकडे आजही फिरकले नाही. येथे घाटी तलावाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तुमसर तालुक्यातील सौदेपूर - खैरटोला रस्त्यालगत जंगलाशेजारी घाटी तलावातून मुरुम खननाची परवानगी तुमसर तहसील कार्यालयाने दिली. मुरुम खननाकरिता महसूल विभागाने गट निश्चित केले. परंतु गट निश्चित कागावर केल्यानंतर प्रत्यक्ष मुरुम खनन करण्याला सुरुवात करण्यात आली. मुरुम उत्खनन सुरु असताना त्यावर महसूल विभागाचे नियंत्रण दिसत नाही. तलाव काठावरून येथे मुरुम खनन केले आहे. काठावरील वृक्षांना येथे धोका पोहचविण्यात आला.
तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी मंगळवारला घाटी तलावात मौका चौकशी करीता गेले होते. तलाव काठावरील पळस व सीता प्रकाराची वृक्ष पडलेली आढळून आले. पंचनामा करून सविस्तर अहवाल तुमसर तहसील कार्यालयाकडे मंगळवारला सादर केला आहे. तुमसर तहसीलदार नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याची येथे शक्यता आहे.
मुरुम खननाची लीज परवानगी प्रसंगी अटी व शर्ती असतात. त्यात झाडे तोडणार नाही, झाडांना इजा पोहचविणार नाही असा नियम आहे. येथे निश्चितच नियमांचा भंग झाल्याचे दिसून येते.
तुमसर येथील महसूल प्रशासनाने ५०० ब्रास मुरुम खननाची परवानगी दिली आहे. मुरुम खनन कामाच्या सुरुवातीला महसूल प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित राहणे गरजेचे होते. मुरुम खनन कामावर येथे नियंत्रण व देखरेख नाही. परवानगी दिली त्यानंतर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
नियमानुसार मुरुम खनन होत आहे काय? ही पाहण्याची जबाबदारी निश्चितच महसूल प्रशासनाची आहे. महसूल प्रशासनाने येथे कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते.
येथे दुर्लक्षाचे कारण काय? हा संशोधनाचा विषय आहे. ‘लोकमत’ने लक्ष वेधल्यावरही पाच दिवसापासून मोका चौकशी करण्यात आली नाही. विषय महत्वपूर्ण नाही काय? तहसील कार्यालयात डझनभर कर्मचारी आहेत. केवळ कामे आहेत ही कारण पुढे करून वेळ मारून नेली जात आहेत. केवळ कागदोपत्री परवानगी देऊन येथे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. परवानगी देण्याचा जर अधिकार आहे तर नियमानुसार मुरुम खनन होत आहे किंवा नाही ते पाहण्याचा अधिकार निश्चितच अधिकाऱ्यांना आहे.
तलावातून मुरुम खनन करताना विशिष्ट नियमांतर्गत परवानगी दिली जाते. घनदाट जंगलात हे तलाव असल्याने वन्य प्राण्यांना येथे निश्चितच धोका आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी येथे लक्ष घालून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मंगळवारी घाटी तलावाला भेट देऊन मोका चौकशी केली. तलाव काठावरील पळस व सीता वृक्ष पडलेले दिसले. तर दोन वृक्षांजवळून मुरुम खनन करण्यात आले आहे. याचा पंचनामा करून अहवाल तुमसर तहसीलदारांकडे सादर केला आहे.
-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर.
सदर जागा जरी वनविभागाची नसली तरी जंगलव्याप्त परिसरात हा तलाव आहे. वन्यप्राण्यांचा जीव तलावातील खड्ड्यांमुळे धोक्यात आहे. वनविभागाने येथे दक्षता घेण्याची गरज होती. संबंधित विभागाने येथे वनविभागाला कळविणे गरजेचे होते.
-कमलाकर निखाडे, सामाजिक कार्यकर्ता, तुमसर.