हौताम्य पत्करणाऱ्या जवानांना श्रद्धांजली
By admin | Published: October 22, 2016 12:26 AM2016-10-22T00:26:31+5:302016-10-22T00:26:31+5:30
कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे..
मान्यवरांचे मार्गदर्शन : पोलीस मुख्यालयात हुतात्मा दिन
भंडारा : कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आॅक्टोबर हा हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने आज पोलीस मुख्यालय भंडारा येथील पोलीस हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे सकाळी ८ वाजता श्रद्धांजली व शोक सलामीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपूर्ण भारतातून एकूण ४७३ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावतील असताना आपल्या मातृभूमिच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना शतश: वंदन असे बोलून शहीद पोलिसांच्या स्मृतिंना उजाळा दिला. २१ आॅक्टोबर १९५९ रोजी लडाख हद्दीत भारत तिबेट सीमेवर १६ हजार फुट उंचावर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० शिपाई गस्त घालत असताना हिंदी-चिनी भाई भाई असा नारा लावणाऱ्या चिनी सेनिकांनी त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. याची चाहूल लागताच सीमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रे असल्याची पर्वा न करता जवानांनी मातृभूमिसाठी प्राणपणाने लढून हौताम्य पत्करले. याच्यावर पोलीस इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडली त्या हॉट्रस्प्रिंग येथे या वीरांचे स्मारक उभारले आहे. तेव्हापासून हा दिवस पोलीस हुतात्मादिन म्हणून पाळला जातो. तेथे संपूर्ण भारतातील पोलिसांनी या विराचे स्मारक उभारले आहेत.
सदर प्रसंगी आर.पी. पांडे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पोलीस अधीक्षक विनीता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व अग्नीशस्त्राद्वारे १२५ काडतूसांच्या फैरी झाडून शोक सलामी देण्यात आली.
सदर प्रसंगी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या शहीदाचे नावे पोलीस उपविभागीय अधिकारी जोगदंड साळी यांनी वाचन केले तसेच भंडारा जिल्ह्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचारी, दिपक सखराम रहिले, योगेश्वर तुकाराम हेडाऊ, शिवलाल सिताराम बरैया, दामोधर वडतकर, रविकुमार जौंजाळ, ईशांत रामरतन भुरे, भोजराम बाभरे, मुलचंद भोयर, मनोज गिऱ्हेपुंजे, बी.डी. बांते, सीआरपीएफ यांच्या स्मृतींना ही उजाळा देण्यात आला. पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी शहीद दामोधर शंकर वडतकर यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या जि.प. पूर्व माध्यमिक शाळा मांडवी येथे जावून कार्यक्रमाला उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)