दुचाकीवर ट्रिपल सीट, तर लायसन्स निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 11:42 PM2021-12-15T23:42:36+5:302021-12-15T23:43:37+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयातर्फे अडीच वर्षापूर्वीच मोटारवाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. मात्र याची अंमलबजावणी झालेली नव्हती. आता राज्यात याची अंमलबजावणी होणार असून पोलिसांनीही कंबर कसली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोटारवाहन सुधारणा अधिनियम २०१९ ची अंमलबजावणी जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ट्रिपल सीट गाडी चालविताना आढळल्यास एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी परवाना निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सावधान, वाहतूक नियमांचे पालन गरजेचे असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयातर्फे अडीच वर्षापूर्वीच मोटारवाहन कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. मात्र याची अंमलबजावणी झालेली नव्हती. आता राज्यात याची अंमलबजावणी होणार असून पोलिसांनीही कंबर कसली आहे.
तर खटला दाखल होणार
- नवीन अंमलबजावणी ओव्हरटेक करताना अडथळा निर्माण करणे, धोकादायकरित्या वाहन चालविणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, नो पार्किंग करणे, फुटपाथवर वाहन उभे करणे आदी प्रकरणात थेट न्यायालयातच खटला दाखल करण्यात येणार आहे.
दंड वाढला तरी मानसिकता जैसे थे
- मोटारवाहन कायद्यांतर्गत विविध कलमांखाली दंडाची रक्कम वाढविण्यात आली असली तरी जे होईल ते पाहून घेऊ अशी मानसिकता काही वाहनधारकांची दिसून येत आहे. त्यामुळे जनजागृतीवर भर द्यायला हवे.
११ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू
- मोटारवाहन सुधारीत कायद्याची अंमलबजावणी जिल्ह्यात ११ डिसेंबरपासून करण्यात आली आहे. आता नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सुधारणा झालेल्या कायद्याबाबत जनजागृतीही करणे अत्यंत गरजेचे आहे. दंडाची रक्कम वाढविण्यात आली असली तरी वाहनचालकांनीही सजग राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळेच अपघातालाही आळा बसू शकणार आहे.
-वसंत जाधव,
जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.