आरोग्य विभागात रिक्त पदांचे ‘त्रिशतक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 12:22 AM2016-08-21T00:22:32+5:302016-08-21T00:22:32+5:30

जिल्हा आरोग्य विभागासह हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग, कुष्ठरोग या पाच महत्वपूर्ण विभागातील जिल्हा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

'Triplets' of vacant positions in health department | आरोग्य विभागात रिक्त पदांचे ‘त्रिशतक’

आरोग्य विभागात रिक्त पदांचे ‘त्रिशतक’

Next

जिल्हा आरोग्य अधिकारी, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग, कुष्ठरोग विभागांचा समावेश
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा आरोग्य विभागासह हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग, कुष्ठरोग या पाच महत्वपूर्ण विभागातील जिल्हा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मुख्य अधिकाऱ्यांच्या पदांसह जिल्ह्यातील सुमारे ३०० च्या वर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी प्रभारींच्या भरोशावर सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी शासनाची पर्यायाने आरोग्य विभागाची आहे. मात्र जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हत्तीरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी व कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक ही महत्वाचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे सदर रिक्त पदे भरण्याऐवजी आरोग्य विभागाने या पदांवर त्याच विभागात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रभारी पदाचा अतिरिक्त भार सोपविला आहे. यातील अनेक पद यावर्षी रिक्त झालेली आहेत. तर काही पद मागील काही वर्षांपासून रिक्त असूनही राज्याच्या आरोग्य यंत्रणेने त्यावर नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे सोपस्कार पार पाडलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाची जबाबदारी प्रभारींच्या भरोशावर सुरू असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डोईफोडे यांचे नागपूरला स्थानांतरण झाले आहे. त्यांच्या पदाचा अतिरिक्त प्रभार वैद्यकीय अधिकारी तथा प्रशिक्षण पथकाचे डॉ. प्रशांत उईके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. येथे अगोदरच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी ही महत्वाची पदे रिक्त आहेत. यातील अनेक पदे ही मागील १० वर्षांपासून रिक्त आहे.

आरोग्य विभागात रिक्त पदे
वर्ग २ अधिकाऱ्यांची १३ पदे रिक्त आहेत. तांत्रिक कर्मचारी ३७ पदे, अतांत्रिक पदे ९० रिक्त आहेत. पदोन्नतीने भरण्याची २१ पदे अद्याप भरण्यात आलेली नाही. सोबतच अन्य प्रवर्गातील १० पदे रिक्त आहेत. येथे सर्व पदे मिळून ९५६ पदे मंजूर असून ८६० पदे भरण्यात आलेली आहे. तर १७१ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीत ११२ पदे मंजूर असून ९१ भरलेली असून २१ पदे रिक्त आहेत. येथील कामे प्रभारींवर सुरू आहे.

हिवताप व हत्तीरोग विभाग एकाचकडे
जिल्हा हिवताप अधिकारी हे पद २००७ पासून रिक्त आहे. तिथे आर. डी. झलके यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. या विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची ३३ तर प्रयोगशाळा तंत्रज्ञची १६ पदे रिक्त आहेत. जिल्हा हत्तीरोग अधिकारी हे पदही रिक्त असून येथे क्षेत्र कार्यकर्ता ही ५० पदे रिक्त आहेत. आर. डी. झलके यांच्याकडे हिवताप व हत्तीरोग विभागाची दोन जबाबदारी असून त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे.
क्षयरोग, कुष्ठरोग विभागही प्रभारींवर
जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांचे नियमित पद रिक्त असल्याने डॉ. वानखेडे यांच्याकडे प्रभार आहे. येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व कंत्राटी कर्मचारी व अधिपरिचारीका पद रिक्त आहेत. तर कुष्ठरोग विभागातील सहायक संचालकांचे पद मागील तीन महिन्यांपासून रिक्त आहे. येथील प्रभार डॉ. मनिषा साकोटे यांच्याकडे असून येथे पर्यवेक्षकाची दोन पदे रिक्त आहेत.

Web Title: 'Triplets' of vacant positions in health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.