भरधाव ट्रकने दुचाकी चालकास चिरडले, पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:47 PM2020-09-24T18:47:24+5:302020-09-24T18:47:32+5:30
भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
लाखांदूर(भंडारा) : लाखांदूर येथून औषधोपचार करून पत्नी व पुतण्या सह दुचाकीने स्वगावी जात असताना अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटना 24 सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास लाखांदूर पवनी राज्यमार्गावरील सावरगाव फाट्यानजीक घडली. ईश्वर वासुदेव येरने(40, रा.आसोला) असे जागीच मृत तरुणाचे नाव असून, अश्विनी ईश्वर येरने(35)असे पत्नी व कोसा योगेश येरने(5)असे किरकोळ जखमींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक तरुण मालकीचे डिस्कवर कंपनीचे दुचाकी (क्रमांक एम एच 36 आर 23 63)ने लाखांदूर येथून औषधोपचार करून किरकोळ जखमी पत्नी व पुतण्यासह आसोला गावाकडे जात होता.
दरम्यान गावानजीकच्या सावरगाव फाट्याजवळ पोहोचताच अचानक विरुद्ध दिशेने येना-या भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार झाला तर पत्नी व पुतण्या किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र घटनेतील भरधाव ट्रक सुसाट वेगाने घटना स्थळावरून पसार झाला. सदर घटनेची माहिती या मार्गावरील नागरिकांना होताच संबंधितांनी तात्काळ लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. माहितीवरून दिघोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गावंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळसुंगे व अन्य पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. तर अखमिन्ना उपचारार्थ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची लाखांदूर पोलिसांनी नोंद केली असून, पसार ट्रकचा शोध सुरू आहे.