बिबट कातडेप्रकरण दडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:56 AM2019-07-10T00:56:23+5:302019-07-10T00:56:48+5:30

जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे प्रकरण गाजत असतानाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी बिबट्याचे कातडे आढळून आले. या प्रकाराने वनविभागात एकच खळबळ उडाली असून आता आपल्याच अधिकाऱ्यांनाच वाचविण्यासाठी प्रकरण दडपण्याचा पुरेपुर प्रयत्न वनविभागाने चालविला आहे.

Trying to suppress leopard skinprints | बिबट कातडेप्रकरण दडपण्याचा प्रयत्न

बिबट कातडेप्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देगुन्ह्याची नोंदच नाही : कांद्री वनपरिक्षेत्रातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे प्रकरण गाजत असतानाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी बिबट्याचे कातडे आढळून आले. या प्रकाराने वनविभागात एकच खळबळ उडाली असून आता आपल्याच अधिकाऱ्यांनाच वाचविण्यासाठी प्रकरण दडपण्याचा पुरेपुर प्रयत्न वनविभागाने चालविला आहे. २४ तास लोटले तरी अद्यापही या प्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल झाला नाही. तसेच कातडे नेमके कुणी व कशासाठी आणले हे ही पुढे आले नाही.
तुमसर तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र चकोले यांच्या शासकीय निवासस्थानी सोमवारी बिबट्याचे कातडे आढळून आले होते. या प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेत तपासासाठी कातडे ताब्यात घेतले. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानंतरही मंगळवारी सायंकाळपर्यंत या प्रकरणात कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे या कातडे प्रकरणाला वेगळे वळण देऊन दडपण्याचा प्रयत्न तर वनविभागाद्वारे केला जात नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात वन वर्तूळातच सुरु आहे.
देवेंद्र चकोले हे कांद्रीचे वनपरिक्षेत्र अधिकारी होते. त्यांची बदली भंडारा येथे करण्यात आली. त्यांच्याजागी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड नियुक्त करण्यात आले. आपल्या शासकीय निवासस्थानातून साहित्य घेऊन जात असताना बिबट्याचे कातडे उघडकीस आले होते. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. नेमके हे कातडे कधीचे आणि कुणी आणले हे अद्यापही पुढे आले नाही.
या प्रकरणात मोठ्या शिकारी टोळीचा तर हात नाही ना. तत्कालीन अधिकाºयाशी या टोळीचा काही संबंध आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदर कातडे विना जप्तीनाम्याने आपणाकडे का ठेवले, चार्ज देताना ते कातडे का बरे विसरले? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे सदर कातडे एका वनमजुराच्या हस्ते पाठविण्यात आले. तर चकोले म्हणतात, मी कातडे देण्यास विसरलो, ती माझी चूक झाली. मात्र या चुकीमागे नेमके काय कारण आहे याचा उलगडा चकोलेच करू शकतात. स्वत:ऐवजी त्यांनी वनमजुराला कातडे घेऊन का पाठविले हे ही न उलगडणारे कोडेच आहे. विशेष म्हणजे २४ तास लोटूनही अद्यापपर्यंत या कातडे प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणी बोलण्यास टाळत आहेत. विशेष म्हणजे कातडे अद्यापपर्यंत जप्त करण्यात आले नाही.
या प्रकरणी उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सदर प्रकरण नागपूर येथील अधिकाºयांकडे आहे. मला याची काहीही माहिती नाही असे सांगत आहेत. एकंदरीत या प्रकरणात वनअधिकारीच अडकत असल्याने त्याला वाचविण्यासाठी सर्व आटापिटा सुरु असल्याचा आरोप होत आहे.

बिबट्याचे कातडे नेमके केव्हाचे?
वनअधिकाºयाच्या शासकीय निवासस्थानावरून कातडे जप्त करण्यात आले. त्यावेळी ते चार ते पाच वर्ष जुने असल्याचे सांगितले जात होते. मात्र मंगळवारी सदर कातडे दहा ते १२ वर्ष जुने असल्याची चर्चा आहे. नेमके बिबट्याचे कातडे केव्हाचे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे सदर कातड्यावरून बिबट्या अल्पवयीन असल्याचे दिसून येते.

वाघाच्या शिकारीतील म्होरक्याची हुलकावणी
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील सीतासावंगी येथे वाघाचे शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते. तब्बल तीन वाघ आणि दोन बिबट्याची शिकार झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी वनविभागाने स्थानिक १२ जणांना अटक केली आहे. मात्र स्थानिक शिकारी ऐवढ््या मोठ्या प्रमाणात वाघाची शिकार करू शकत नाही, या निष्कर्षाप्रत वनविभाग पोहचले आहे. या शिकारीत मध्यप्रदेशातील टोळीचा हात असल्याचा संशय वनविभागाला आहे. त्यामुळेच वनविभागाचे पथक गत आठवडाभरापासून मध्यप्रदेशात तळ ठोकून आहेत. परंतु अद्यापही या शिकारीचा म्होरक्या त्यांच्या हातात सापडला नाही. तो वनपथकाला हुलकावणी देत असल्याची माहिती आहे. स्थानिक शिकाºयांनी दिलेल्या माहितीवरून वनविभागाचे पथक मध्यप्रदेशातील अनेक गावात जावून शिकारीच्या म्होरक्याचा शोध घेत आहेत.

सदर प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समोर आला पाहिजे. वनाच्या रक्षणासाठी असलेल्या कार्यालयात असे प्रकार घडत असतील तर वनात काय होत असेल. वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष दिले नाही तर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरु.
-चंदू पिल्लारे, जिल्हा परिषद सदस्य, कांद्री.

Web Title: Trying to suppress leopard skinprints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.