शस्त्र तस्करी प्रकरणासाठी तुमसर पोलीस बालाघाटला रवाना
By admin | Published: August 22, 2016 12:25 AM2016-08-22T00:25:22+5:302016-08-22T00:25:22+5:30
शस्त्र तस्करी प्रकरणी बालाघाट येथे दहा जणांना अटक करण्यात आली होती.
पंजाब पोलीस तुमसरात दाखल : तस्करीचे आंतरराज्यीय तार
तुमसर : शस्त्र तस्करी प्रकरणी बालाघाट येथे दहा जणांना अटक करण्यात आली होती. यात तुमसर येथील तीन युवकांचा समावेश आहे. अधिक चौकशीकरिता रविवार रोजी तुमसर पोलिसांचे पथक बालाघाट येथे रवाना झाले. पंजाब पोलिसांचे एक पथक तुमसर व बालाघाट येथे येऊन गेल्याचे समजते. आंतरराज्यीय प्रकरण असल्याने पोलीस गोपनीय चौकशी करीत आहेत. शस्त्रे तस्करीचे तार अनेक राज्यांत जुळल्याचे समजते.
आठवड्याभरापूर्वी बालाघाट पोलीस व सायबर सेलने सापळा रचून रामपायली पोलीस ठाण्याअंतर्गत भजियादंड येथे शस्त्र तस्करी प्रकरणात १० आरोपींना मुद्देमालासह अटक केली. यात आठ पिस्टल, एक रिवाव्ल्हर, दोन दूचाकी व एक चारचाकीचा समावेश आहे. यात तुमसरच्या तीन युवकांचा समावेश आहे.
१० हजारात ही शस्त्र विकली जात होती. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सुरु होता. बालाघाट येथून रामपायली पोलीस ठाण्यांंतर्गत भजियादंड येथे हा नेहमी सौदा व्हायचा अशी माहिती आहे. पंजाब येथून जबलपूर, बालाघाट असा हा शस्त्रे तस्करीचा मार्ग आहे. पंजाब पोलीस तीन दिवसापूर्वी तुमसरात चौकशी करिता येऊन गेले. येथे लॉज व हॉटेलची त्यांनी चौकशी केली. याबाबत मात्र तुमसर पोलीस अनभिज्ञ आहेत.
आज,रविवार रोजी तुमसर पोलिस बालाघाट येथे रवाना झाले. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता ते गेले अशी माहिती आहे. मागील दोन वर्षात किती राज्यात या टोळीने शस्त्रे विकली त्याचा तपास बालाघाट पोलीस करीत असल्याचे समजते. तुमसर येथील युवकांचा यात किती भागीदारी आहे, त्यांनी किती शस्त्रे आणली, विकली व कुणाला दिली याचा तपासाची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
तुमसर पोलिसांचे एक पथक बालाघाट येथे चौकशीकरिता रविवारी रवाना झाले. चौकशीकरिता पोलीस पथक पाठविण्यात आले. पंजाब पोलीस तुमसरात आल्याबद्दल माहिती नाही.
- राजेंद्र शेट्टे,
पोलीस निरीक्षक, तुमसर