तुमसर नगर पालिकेत स्वीकृत सदस्यपदी पडोळे, घरडे यांची वर्णी
By admin | Published: February 9, 2017 12:25 AM2017-02-09T00:25:31+5:302017-02-09T00:25:31+5:30
नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी बुधवारला सकाळी ११.३० वाजता मावळते नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्याकडून नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
नगराध्यक्ष प्रदीप पडोळेंचे पदग्रहण : उपाध्यक्षपदी कांचन कोडवानी
तुमसर : नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी बुधवारला सकाळी ११.३० वाजता मावळते नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्याकडून नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यपदासाठी निवडणूक पार पडली.
२३ सदस्यीय नगर पालिकेत भाजपचे १५, राकाँचे २, काँग्रेसचे ३, अपक्ष ३ असे बलाबल आहे. उपाध्यक्षपदाकरिता भाजपकडून कांचन कोडवानी यांनी तर राकाँकडून सलाम तुरक यांनी अर्ज दाखल केला. सलाम तुरक यांनी अर्ज मागे घेतल्याने कोडवानी यांची अविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदा करिता भाजपतर्फे कैलाश पडोळे, प्रमोद घरडे, शैलेश मेश्राम, सूरज पशिने, सुनिल लांजेवार, शैलेश साखरवाडे यांची नावे स्वीकृतीकरिता पाठविली होती. भाजपने कैलाश पडोळे व प्रमोद घरडे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. कार्यभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे हे खुर्चीवर विराजमान झाले. यावेळी उपाध्यक्ष कांचन कोडवानी, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी विकासकामांचा धडाका सुरुच राहील. शहरातील छोटी मोठी कामेसुद्धा प्राधान्याने केली जातील असे सांगितले. भाजपातर्फे आयोजित पदग्रहण समारंभात आमदार प्रा.अनिल सोले, आमदार चरण वाघमारे, माजी खासदार शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, डॉ.सच्चिदानंद फुलेकर, माजी आमदार मधुकर कुकडे, श्रीकांत जोशी, ललीतकुमार थानथराटे, रामकुमार गजभिये, उल्हास फडके, भंडाऱ्याचे नगरसेवक मंगेश वंजारी, चंद्रशेखर रोकडे, मुकेश थानथराटे, विक्रम लांजेवार उपस्थित होते. संचालन ललीत शुक्ला यांनी तर आभारप्रदर्शन नगरसेवक मेहताबसिंग ठाकुर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
नगरसेवकांशी शाब्दिक बाचाबाची
कैलाश पडोळे व प्रमोद घरडे यांच्या नावाची घोषणा पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अमरनाथ रगडे व बाळा ठाकूर यांनी आक्षेप नोंदविले. पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांना स्वीकृत सदस्य निवडीचे निकष काय आहेत असा काँग्रेसचे नगरसेवक अमरनाथ रगडे व बाळा ठाकुर यांनी विचारला. तेव्हा नगराध्यक्ष पडोळे व नगरसेवक रगडे व ठाकुर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सभेत गदारोळ झाला. जोरजोराने आवाज बाहेर येत असल्याने भाजपच्या कार्यकर्ते सभागृहात जाण्याकरिता प्रयत्न केला. महिला नगरसेविका या गदारोळात अक्षरश: घाबरुन गेल्या. काय होत आहे हे त्यांना क्षणभर कळलेच नाही. १५ ते २० मिनिटे सभेत गदारोळ सुरुच होता. इतर सदस्यांनी मध्यस्थी करून गदारोळ शांत केला. परंतु येथे सत्ताधारी व विरोधक असा सामना यापुढेही सुरु राहण्याची शक्यता आहे.