तुमसर बपेरा राज्य मार्गाने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:02+5:302021-01-04T04:29:02+5:30
सिहोरा येथे शनिवार दिनी आठवडी बाजार भरतो. तसेच बैल बाजारही भरविण्यात येतो. त्यामुळे येथे नागरिकांची गर्दी राहात आहे. बाजारात ...
सिहोरा येथे शनिवार दिनी आठवडी बाजार भरतो. तसेच बैल बाजारही भरविण्यात येतो. त्यामुळे येथे नागरिकांची गर्दी राहात आहे. बाजारात ४७ गावातील नागरिक खरेदीसाठी येतात. ते आपली वाहने थेट राज्य मार्गावर उभी करतात. याशिवाय नाकाडोंगरी राज्य मार्गावरील वाहतूक तुमसर बपेरा राज्य मार्गावरून वळविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली होती. कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता होती. वाहतुकीस अडथळा ठरणारी दुकाने हटविण्याची नागरिकांनी मागणी होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेतले. बँक ऑफ इंडिया चौक ते सम्राट अशोक बुद्ध विहारपर्यंत राज्य मार्ग मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवार आठवडी बाजार दिनी राज्य मार्गावर दुकाने लावण्यात आल्यानंतर पोलीस ताफ्यासह दुकानदारांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर रस्त्यावर असलेली दुकाने हटविण्यात आली. वाहने थेट राज्य मार्गावर उभी केली जात आहेत. यामुळे मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या वाहनांवर अंकुश ठेवण्याची सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आली. या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
बाॅक्स
विकासकार्यासाठी एक पाऊल
सिहोरा आठवडी बाजारासाठी जागा नियोजित करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात जागा उपलब्ध नाही. याशिवाय बाजारातील दुकानांची व्याप्ती वाढत आहे. निश्चितच जागा अपुरी पडत आहे. यामुळे व्यापारी संकुलनाचे नियोजन तयार करण्यात आले आहे. बाजारातील व्यापारी संकुल दुकानदारांना फायदेशीर ठरणार आहेत. याशिवाय बसस्थानक परिसरात तयार करण्यात येणारे व्यापारी संकुल दुकानदारांना प्रगतीचा मार्ग दाखविणारे ठरणार आहे. या व्यापारी संकुलामुळे बहुतांश दुकानदारांना दिलासा मिळणार आहे.