तुमसर, साकोलीत लाडक्या बहिणींची मतदानात आघाडी, भंडाऱ्यातही बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 03:32 PM2024-11-21T15:32:14+5:302024-11-21T15:33:22+5:30

पुरुष पिछाडीवर : सायंकाळी ५ वाजेपर्यंत महिलांचे सरासरी ६४.७८ टक्के मतदान

Tumsar, beloved sisters lead in the polls in Sakoli, equal in Bhandara too | तुमसर, साकोलीत लाडक्या बहिणींची मतदानात आघाडी, भंडाऱ्यातही बरोबरी

Tumsar, beloved sisters lead in the polls in Sakoli, equal in Bhandara too

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
तुमसर आणि साकोली विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणींनी मतदानात आघाडी घेतल्याचे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तीनहीं विधानसभा मतदारसंघांतील महिलांच्या मतदानाची टक्केवारी ६६.७१ टक्के होती, तर पुरुषांची टक्केवारी ६५.०२ टक्के होती. मतदानात आघाडी घेतली असली तरी मतपेटीतून या बहिणी कुणाची पाठराखण करणार, हे शनिवारी समोर येणारच आहे.


महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला, महायुतीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी या योजनेचा जोरदार प्रचार केला. 


एवढेच नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांनी भंडाऱ्यातील सभेतही महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि ओवाळणी म्हणून मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. नेत्यांच्या या आवाहनाला मतदानाच्या रूपाने मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी हे मतदान कुणाच्या पारड्यात जाणार, यावरून या लाडक्या बहिणींचा कौल दिसणार आहे. 


तुमसरच्या तुलनेत विचार करता साकोली मतदारसंघात महिलांच्या मतदानाची टक्केवारी दोनने अधिक आहे. तिथे पुरुषांची मतदानाची टक्केवारी ६६.०७, तर महिलांची ६८.३५ टक्के आहे. मात्र भंडारा मतदारसंघात महिला व पुरुषांची मतदानाची टक्केवारी जवळपास बरोबरीत आहे. 


बूथवरही महिलाच अधिक
भंडारा शहरात लागलेल्या मतदानाच्या बूथवर यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर महिला मतदार पहावयास मिळाल्या. यापूर्वी बुथवर बहुतांश पुरुष मतदारच असायचे, यावेळी ही जागा महिला आणि तरुणींनी घेतल्याचे दिसून आले. यावरून लाडक्या बहिणींचा उत्साहदेखील दिसून आला. 


पुरुषांपेक्षा १०,७०५ महिलांचे मतदान अधिक
तीनही मतदारसंघांत एकूण मतदारांची संख्या १० लाख १६ हजार ८७० आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार यात ३ लाख २९ हजार ६२२ पुरुषांनी, तर ३ लाख ४० हजार ३२७ महिलांनी मतदान केले. पुरुषांपेक्षा १० हजार ७०५ अधिक महिलांनी मतदान केले आहे. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ६५,०२, तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ६६.७४ इतकी आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी ६५.८० नोंदविण्यात आली आहे.


तुमसरात भरगच्च प्रतिसाद 
महिलांचा सर्वाधिक प्रतिसाद तुमसर मतदारसंघात आहे. तुमसरच्या तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, या मतदारसंघात सकाळपासूनच महिला मतदानाकरिता घराबाहेर पडल्या होत्या. तुमसर व मोहाडी या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात विशेषतः महिलांनी मतदानाकरिता केंद्रावर मोठी गर्दी केली होती, महिलांच्या मोठ्या रांगा मतदान केंद्रावर दिसून आल्या. त्या तुलनेत पुरुष मतदान करण्याकरिता घराबाहेर निघण्याचे प्रमाण येथे कमी होते. त्यामुळे येथील निकाल आश्चर्यकारक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही,

Web Title: Tumsar, beloved sisters lead in the polls in Sakoli, equal in Bhandara too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.