कोरोनातही सेंद्रिय शेतीसाठी तुमसर शेतकरी उत्पादन कंपनीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:07+5:302021-05-31T04:26:07+5:30

भंडारा: रासायनिक खतांचा वापर वाढत चालल्याने आरोग्यासह शेतजमिनीवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा व विषमुक्त ...

Tumsar Farmer Production Company's initiative for organic farming in Corona too | कोरोनातही सेंद्रिय शेतीसाठी तुमसर शेतकरी उत्पादन कंपनीचा पुढाकार

कोरोनातही सेंद्रिय शेतीसाठी तुमसर शेतकरी उत्पादन कंपनीचा पुढाकार

Next

भंडारा: रासायनिक खतांचा वापर वाढत चालल्याने आरोग्यासह शेतजमिनीवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा व विषमुक्त अन्नाची निर्मिती व्हावी, यासाठी तुमसर शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेतला आहे. यासाठी गत चार वर्षांपासून तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथील शेतकरी उत्पादक कंपनी सेंद्रिय शेतीसाठी अनेक उपक्रम राबवत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा, यासाठी सिंधपुरी येथील तुमसर शेतकरी उत्पादक कंपनीने कृषी विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ॲझोलाचे मोफत वितरण केले आहे. केंद्रीय शेती व प्रगत तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, या हेतूने सिंधपुरी येथील तरुण शेतकरी पवन कटनकार यांनी शेतकरी कंपनीची स्थापना केली. त्यानंतर पहिल्याच वर्षी परिसरातील पन्नास शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर गांडूळ खत वाटप केले. यातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचा आलेला अनुभव व जमिनीचा पोत सुधारल्याने अनेकांनी सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेतला. यावरच न थांबता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी व दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, तालुका कृषी अधिकारी विकास काळे यांच्या मदतीने जिल्ह्यातील सातही तालुक्यात कृषी सहाय्यकांमार्फत गरजू शेतकऱ्यांना ॲझोला मोफत वितरण केला. कटनकार यांच्याकडे ४० गाई आहेत. त्यामुळे त्यांना शेण व गोमूत्र याची कमतरता भासत नाही. यातूनच त्यांनी गांडूळ खत निर्मिती युनिट सुरू केले आहे. शेती व्यवसायासाठी गांडूळ खत निर्मितीचे शेतकऱ्यांना ते धडे देतात. शेतकरी उत्पादक कंपनीचे ३०६ सदस्य आहेत, तर शेतकरी कंपनीचे अध्यक्ष पवन कटनकार, सचिव रविशंकर रहांगडाले, डायरेक्टर महेंद्र गिरडकर, शशिकांत तोडणकर, लोकेश कटनकार, अक्षय शेंडे, दिनेश तुरकर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

कोट

शेतकऱ्यांनी भविष्याचा विचार करून सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्याने दुग्ध व्यवसाय करून स्वतः गांडूळ खत निर्मितीसह सेंद्रिय शेती करावी. यासाठी मी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ॲझोला मोफत देऊन सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करत आहे. याशिवाय आम्ही गांढूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शनही करतो.

पवन कटनकार, अध्यक्ष तुमसर शेतकरी उत्पादक कंपनी, सिंधपुरी

कोट

शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर मर्यादितच करायला हवा. ॲझोलामुळे जमिनीचा पोत सुधारतो. यासोबत धानाच्या बांधीत टाकल्यास नत्राचा पुरवठा होऊन त्यामुळे युरिया वापरण्याची गरज भासत नाही. शेतीपूरक दुग्ध व्यवसाय केल्यास शेतीला शेणखत मिळेल आणि शेती उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात भरघोस वाढ होईल.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

कोट

पवन कटनकार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ॲझोलाचे मोफत वितरण केले, हा स्तुत्य उपक्रम आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी ॲझोलाची निर्मिती करावी व त्याचा वापर गुरांना चारा म्हणून अथवा धानपिकासाठी खत म्हणून करावा.

शांतीलाल गायधने, तंत्र अधिकारी, भंडारा

Web Title: Tumsar Farmer Production Company's initiative for organic farming in Corona too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.