तुमसर एमआयडीसीकडे उद्योजकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:06 PM2019-04-22T22:06:07+5:302019-04-22T22:06:40+5:30
केंद्र तथा राज्य शासनाने कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीला परवानगी दिली. तुमसर येथे ३० वर्षापुर्वी गोंदिया महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. अडीच एकरात असलेल्या या एमआयडीसीत मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहे. मात्र या एमआयडीसीकडे उद्योजकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भुखंड रिक्त असून काही कारखाने बंद पडले आहेत.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : केंद्र तथा राज्य शासनाने कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र एमआयडीसीला परवानगी दिली. तुमसर येथे ३० वर्षापुर्वी गोंदिया महामार्गावर देव्हाडी शिवारात एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. अडीच एकरात असलेल्या या एमआयडीसीत मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहे. मात्र या एमआयडीसीकडे उद्योजकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. अनेक भुखंड रिक्त असून काही कारखाने बंद पडले आहेत.
देव्हाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने अडीच एकर जागेत एमआयडीसी उभारण्यात आली. लहान-मोठ्या कारखानदारांनी भुखंड आरक्षीत करून घेतले. काही कारखाने येथे सुरू झाले तर काही बंद पडले. सध्या येथे चार ते पाच कारखाने सुरू आहेत. रिक्त भुखंडांची संख्याही मोठी आहे. गत काही वर्षापासून बंद पडलेले कारखाने भंगारावस्थेत आहे. येथे वीज, पाणी, रस्ते आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
भुखंड प्राप्त झाल्यानंतर किमान तीन वर्षात कारखाना सुरू करण्याचा नियम आहे. परंतु येथे वर्षानुवर्ष भुखंड रिक्त आहे. एमआयडीसीत लहान उद्योजकांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. येथे लहान कारखाने अखेरच्या घटका मोजून बंद पडल्या आहेत. एमआयडीसीचे मुख्य कार्यालय भंडारा येथे आहे. दरवर्षी शासनाला कारखान्यांची स्थिती शासनाला कळवावी लागते. किती कारखाने बंद आहे किती सुरू आहे याची माहिती सादर करण्यात येत आहे. परंतु अद्याप येथे दखल घेण्यात आली नाही. केवळ कागदोपत्री माहिती संकलीत करून शासनाला कळविली जाते.
तरूण उद्योजकाला येथे भुखंड मिळत नाही. भुखंड नाही अशी माहिती संबंधित विभाग देत आहे. भुखंड आरक्षीत आहे परंतु कारखान्याचा येथे पत्ता नाही. पुन्हा किती दिवस सदर भुखंड त्या कारखानदाराजवळ राहणार हा मुख्य प्रश्न आहे. एमआयडीसी मध्ये उद्योजकाना आकर्षीत करण्यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांकडून कवडीमोल किंमतीत घेतल्या जमिनी
देव्हाडी येथे आठ ते दहा शेतकऱ्यांकडून सुमारे अडीच हेक्टर शेतजमीन घेण्यात आली. त्यावेळी कवळीमोल किंमत देण्यात आली. एमआयडीसीसाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कारखान्याची संख्या वाढली नाही. औद्योगिक धोरणावर ठपका ठेवण्यात येतो. मुख्य रस्त्यावरील जमीनी लाख मोलाच्या असताना कवळीमोल भावात घेण्यात आल्या होत्या.
एमआयडीसीत जीवन प्राधिकरणची इमारत
देव्हाडी एमआयडीसीची जागा मौल्यवान आहे. अनेक वर्ष ती पडित होती. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र व इमारत येथे तयार करण्यात आली आहे. तिही बंद राहते. प्राधीकरणाचे साहित्य येथे पडून आहेत.
रिक्त भूखंडाची माहिती मागितली
देव्हाडी एमआयडीसी येथे बंद पडलेले कारखाने व रिक्त भुखंडांची माहिती राज्य शासनाने मागितल्याची माहिती आहे. भंडारा व गोंदिया येथे एमआयडीसीचे कार्यालय आहे, कारखाने बंद पडल्याची कारणे, कारखाना किती वर्ष सुरू होता, याचा अहवाल मागविला आहे.
एमआयडीसी सुरू करताना येथे उद्योग येतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात कारखानदार आलेच नाही. त्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. कारखाने बंद पडल्याने बेरोजगारी वाढत आहे.
-डॉ. पंकज कारेमोरे,
युवा नेते तुमसर.