'या' शहरातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारतमध्ये अन् दुसरे भंगारात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:43 PM2023-02-07T15:43:10+5:302023-02-07T15:49:52+5:30

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक

Tumsar Road added in Amrit Bharat but the Tumsar town railway station left in ruins | 'या' शहरातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारतमध्ये अन् दुसरे भंगारात

'या' शहरातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारतमध्ये अन् दुसरे भंगारात

googlenewsNext

मोहन भाेयर

तुमसर (भंडारा) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शहरातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारतमध्ये अन् दुसरे रेल्वेस्थानक भंगारात अशी स्थिती सध्या तुमसर येथे दिसून येते. ब्रिटिशकालीन तुमसर - तिरोडी मार्गावरील महत्त्वाचे तुमसर टाऊन रेल्वेस्थानक अखेरच्या घटका मोजत असून, त्याच्या पुनरूज्जीवनाकडे लक्ष देण्याऐवजी कोट्यवधीच्या सदनिका त्याच परिसरात बांधल्या जात आहेत.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जोडणारे तुमसर शहर रेल्वेसाठीही तेवढेच महत्त्वाचे आहे. मुंबई - हावडा मार्गावर तुमसर रोड जंक्शन, तर तुमसर - तिरोडी मार्गावर तुमसर शहरात टाऊन रेल्वे स्थानक आहे. मध्य प्रदेशात जाण्यासाठी हे महत्त्वाचे स्थानक आहे. ब्रिटिशांनी जगप्रसिध्द मॅग्नीज खाणीची वाहतूक करण्यासाठी सातपुडा पर्वत रांगा खोदून हा रेल्वे मार्ग तयार केला होता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गावर तुमसर टाऊन, गोबरवाही, डोंगरी आणि तिरोडी ही चारच रेल्वे स्थानक असून, येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ब्रिटिशानी बांधलेली तुमसर टाऊन रेल्वे स्थानकाची इमारत आता भग्नावस्थेत झाली आहे. केवळ मालगाड्यांची आवक - जावक येथून सुरू असते. येथून मोठा महसूल प्राप्त होतो. परंतु, स्थानकाच्या दुरूस्तीसाठी उपाययोजना केल्या जात नाहीत.

दुसरीकडे तुमसर रोड रेल्वे स्थानकाचा अमृत भारतमध्ये समावेश करण्यात आला आहे. या रेल्वे स्थानकाचा चेहरा - मोहरा बदलला जाणार आहे. सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, त्याच शहरातील दुसरे रेल्वे स्थानक मात्र अखेरच्या घटका मोजत आहे.

रात्री असते अंधाराचे साम्राज्य

तुमसर टाऊन रेल्वे स्थानक परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. साधे प्रसाधनगृहही नाही. प्रवाशांना बसण्यासाठी टीनशेड लावण्यात आले आहे. रात्री अंधाराचे साम्राज्य असते. रेल्वे कर्मचारीही स्थानकावर दिसत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना माेठा त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु, सुविधा नसल्याने प्रवासी पाठ फिरवीत आहेत.

कोट्यवधीच्या सदनिकेचे बांधकाम

एकीकडे तुमसर टाऊन स्थानकाची स्थिती दयनीय असताना दुसरीकडे त्याच परिसरात रेल्वे परिसरात कोट्यवधीच्या सदनिकांचे बांधकाम सुरू आहे. रेल्वे स्थानक अत्याधुनिक करण्याची गरज असताना सदनिका बांधकाम करून काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Tumsar Road added in Amrit Bharat but the Tumsar town railway station left in ruins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.