तुमसर रोड-तिरोडी विशेष गाडी नऊ महिन्यापासून बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:09 IST2025-01-10T15:08:14+5:302025-01-10T15:09:07+5:30
Bhandara : नागपूर विभागात महसूल देणारे तुमसर तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक

Tumsar Road-Tirodi special train closed for nine months!
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ट्रेन क्रमांकाच्या सुरुवातीला शून्य लावला असेल तर त्या गाडीच्या दर्जा हा विशेष होतो. शून्य हटविल्यानंतर गाडीची सामान्य दर्जात गणना होते. कोरोना काळात विशेष प्रवासी गाड्या चालविण्यात आल्या होत्या. त्या सर्व गाडी क्रमांकाच्या समोर शून्य लावण्यात आला होता. शून्य लावण्याचा अधिकार हा त्या विभागातील डीआरएम यांना रेल्वे प्रशासनाने दिला आहे. तुमसर रोड तिरोडी या डेमू प्रवासी गाडी क्रमांकाच्या समोर शून्य लागला आहे. ही गाडी मागील नऊ महिन्यापासून बंद आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे मार्गावर तुमसर रोड हे मोठे जंक्शन असून नागपूर विभागात रेल्वेला महसूल मिळवून देणारे तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकातून ब्रिटिशकालीन तिरोडी व त्यानंतर मागील दोन वर्षांपूर्वी कटंगी व थेट बालाघाट येथे जाण्याकरिता रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आला आहे. तुमसर रोड रेल्वे स्थानकातून सकाळी १०:३० ची डेमो ट्रेन मागील नऊमहिन्यापासून कायम बंद आहे. या वेळेला तिरोडी व कटंगी येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मध्य भारतातून जाणारा हा सर्वात कमी वेळेच्या व खर्चाच्या रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर दिवसातून चार वेळा प्रवासी गाड्या धावतात. पहाटे ४.३० धावणारी तुमसर रोड-तिरोडी ही प्रवासी गाडी बोटावर मोजण्याइतके प्रवासी घेऊन जाते.
शून्य लावल्यानंतर स्पेशल ट्रेन
शून्य लावल्यानंतर गाडीच्या दर्जा हा स्पेशल ट्रेन म्हणून होतो. त्या प्रवासी गाडीला त्या विभागाचे डीआरएम नियंत्रण ठेवतात. शून्य हटविण्याचा अधिकार त्या विभागातील डीआरएम यांना रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. शून्य हटविल्यानंतर स्पेशल गाडीच्या दर्जा समाप्त होतो. नऊ महिन्यापासून बंद असलेल्या व सकाळी धावणाऱ्या तुमसर रोड तिरोडी या प्रवासी गाडीला पूर्ववत प्रवाशांच्या सोयीकरिता सुरू करण्याची गरज आहे. या गाडीचा जुना क्रमांक ७८८१३ व ७८८१४ असा होता. ही गाडी तुमसर रोड ते बालाघाट व बालाघाट ते तुमसर रोड अशी धावत होती. पहिले प्रशासनाने आता येथे ०७८१३ व ०७८१४ असा नवीन क्रमांक दिला आहे.
डीआरएम यांची निरीक्षण भेट
तुमसर रोड रेल्वे स्थानकाला नव्याने रुजू झालेले नागपूर विभागाचे डीआरएम दीपककुमार गुप्ता यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी तुमसर रोड तिरोडी कटंगी ही गाडी पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
"जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्याच्या दावा रेल्वे प्रशासन करीत आहे. परंतु मागील नऊ महिन्यापासून डेमो ट्रेन बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरील रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करावे."
- प्रमोद तितीरमारे, माजी उपाध्यक्ष, नगरपरिषद, तुमसर