तुमसर - तिरोडी आंतरराज्य पॅसेंजर गाडी अद्याप लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:37 AM2021-08-26T04:37:14+5:302021-08-26T04:37:14+5:30
तुमसर : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या. मात्र, व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली तुमसर - तिरोडी पॅसेंजर ...
तुमसर : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या. मात्र, व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली तुमसर - तिरोडी पॅसेंजर गाडी अद्याप बंदच आहे. लहान स्थानकांवरील प्रवाशांची गैरसोय होत असून, बस व इतर वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मध्य प्रदेशातील नागरिकांचा तुमसरसह इतर शहरांशी असलेला संपर्क गत दीड वर्षापासून तुटला आहे.
कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर एक्स्प्रेस गाड्या स्पेशल ट्रेन म्हणून सुरू केल्या आहेत. त्यातही आरक्षण व कन्फर्म तिकीट काढूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु लहान रेल्वेस्थानकात एक्स्प्रेस व स्पेशल ट्रेनला थांबा नाही. त्यामुळे लहान रेल्वेस्थानकातील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येत नाही. अनलॉक सुरू झाल्यानंतरही लोकल व पॅसेंजर गाड्या रेल्वे प्रशासनाने अद्याप लॉक केल्या आहेत. यासंदर्भात स्थानिक रेल्वे प्रशासनाचे अधिकारी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले नाहीत, असे सांगत आहेत. बस वाहतूक सुरू झाली आहे. परंतु पॅसेंजर गाड्या का सुरू झाल्या नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
तुमसर - तिरोडी आंतरराज्य प्रवासी गाडी दीड वर्षापासून बंद आहे. या मार्गावर एक्स्प्रेस व स्पेशल गाड्या धावत नाहीत. या मार्गावरील नागरिकांना बसने महागडा प्रवास करावा लागतो. काही नागरिकांना दुचाकीने प्रवास करावा लागतो, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तुमसर ते तिरोडी सुमारे ४५ किलोमीटरचे अंतर आहे. मध्यप्रदेशातील नागरिक तुमसर शहरात भाजीपाला घेऊन येत होते. त्यांना ही गाडी सोयीची ठरली होती. प्रवासी गाडी बंदमुळे व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे. मध्यप्रदेशाच्या नागरिकांचा संबंध तुमसर, भंडारा व नागपूरशी येतो. परंतु प्रवासी गाडी बंद असल्यामुळे त्यांचे येणे - जाणे बंद झाले आहे.
बॉक्स
इतवारी - दुर्ग पॅसेंजरमध्ये वाढली गर्दी
मुंबई हावडा मार्गावर एक्स्प्रेस व स्पेशल गाड्या सुरू आहेत. इतवारी दुर्ग ही एकमेव पॅसेंजर गाडी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. या गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे. मुंबई हावडा रेल्वे मार्गावर लोकल प्रवासी गाड्या सुरू करण्याची गरज आहे. एक्स्प्रेस गाड्यातही प्रवाशांची संख्या वाढली असून, या गाडीतही मोठी गर्दी दिसत आहे.
कोट
आरक्षण व कन्फर्म तिकीट असल्यासच एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करता येतो. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करून या मार्गावर प्रवासी लोकल गाड्या तत्काळ सुरू कराव्यात.
-प्रा. कमलाकर निखाडे, महासचिव, जिल्हा काँग्रेस कमिटी