तुमसर वाहतूक पोलिसांची रस्ते सुरक्षा सप्ताह जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:30 AM2021-02-08T04:30:49+5:302021-02-08T04:30:49+5:30
तुमसर - रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्ताने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी तुमसर शहर वाहतूक पोलिसांनी आगळीवेगळी मोहीम हाती घेतली आहे. नेहमी ...
तुमसर - रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्ताने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी तुमसर शहर वाहतूक पोलिसांनी आगळीवेगळी मोहीम हाती घेतली आहे. नेहमी दंड लावूनही अनेक वाहनचालक नियम पाळत नसल्याने वाहतूक पोलीस आता गांधीगिरी करताना दिसत आहेत. जे वाहतुकीचे नियम नियमित पाळतात, त्यांना गुलाबाचे पुष्प दिले जात आहे. जे नियम पाळत नाही, त्यांना नियमावलीचे पत्रक देत कायदा पाळण्याचे आवाहन शहरातील विविध चौकांत वाहतूक पोलीस करत आहेत.
तुमसर शहरातील वाहतूककोंडीसाठी वाहनधारकांची बेशिस्तच कारणीभूत ठरत आहे. नियमांचे पालन करण्याऐवजी नियम मोडण्याकडेच वाहनधारकांचा अधिक कल असल्याने वाहतूककोंडी जीवघेणी ठरत आहे. वारंवार सूचना देऊनही वाहनधारक नियमांचे पालन करीत नाहीत. उलट, पोलिसांनाच दमदाटी करून रुबाब केला जातो. अशा प्रवृत्तीला स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत असल्याने वाहतुकीला शिस्त लावणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आता रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन तुमसरचे पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पो.ना दिलीप धावळे पो सि प्रणय चौधरी, विजय निंबार्ते, समीत रहांगडालेसह अन्य कर्मचाऱ्यांनी रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील जुने बसस्थानक, तांबी चौक, बावनकर चौक, नवीन बसस्थानक, खापा चौक येथे नागरिकांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली आहे.