विरली येथे गढूळ पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:33 AM2021-09-13T04:33:59+5:302021-09-13T04:33:59+5:30

सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणीपुरवठा योजना कार्यरत ...

Turbid water supply at Virli | विरली येथे गढूळ पाण्याचा पुरवठा

विरली येथे गढूळ पाण्याचा पुरवठा

Next

सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली पूरक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथे १ लाख २५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ असून सुमारे पाचशे वैयक्तिक नळजोडण्यांव्दारे गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो.

मात्र , ३-४ दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसाने आणि गोसे खुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचे पाणी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींमध्ये घुसले. या पाणीपुरवठा योजनेवर जलशुद्धिकरण संयंत्र बसविले नसल्याने पुराचे पाणी सरळ नळाद्वारे गावकऱ्यांच्या घागरीमध्ये येत आहे. गावकऱ्यांना या पाण्याचा उपयोग आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी करतानाही शंभरवेळा विचार करावा लागतो. येथे ११ हातपंप आहेत. मात्र , त्यापैकी काही हातपंपांचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे चांगले पाणी येत असलेल्या हातपंपांवर महिलांची बेसुमार गर्दी होत असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांमध्ये भांडणे होत आहेत. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपांवर ताटकळत बसावे लागते.

बॉक्स

पावसाळ्यात गढूळ पाण्याची समस्या नित्याचीच

पाणीपुरवठा योजनेवर जलशुद्धिकरण संयंत्र बसविले नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नदीचा जलस्तर वाढताच गावकऱ्यांना गढूळ पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो . मात्र, स्थानिक प्रशासनाने अद्याप कुठल्या एखाद्या योजनेतून जलशुद्धिकरण संयंत्र बसविण्यासाठी हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात आम्हाला शुद्ध पाणी केव्हा मिळणार? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

आरओ प्लँट केवळ शोभेसाठीच ?

२०१७-१८ मध्ये जिल्हा परिषदेकडून येथे १० हजार लिटर क्षमतेचे आरओ प्लँट बसविण्यात आले. ग्रामप्रशासनाने त्यावेळी गावकऱ्यांना पाच रुपयांमध्ये २० लिटर पाणी देण्याची योजना आखली होती. मात्र , किती गावकऱ्यांना या आरओ प्लँटचे पाणी मिळाले? हा संशोधनाचा विषय ठरावा. हे आरओ प्लँट गत वर्षभरापासून नादुरुस्त असून केवळ शोभेची वस्तू ठरले आहे.

Web Title: Turbid water supply at Virli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.