तुरीला ९ हजार रुपयांवर भाव; पण शेतकऱ्यांच्या पदरात काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 01:42 PM2024-10-16T13:42:41+5:302024-10-16T13:43:05+5:30

तूर निघण्यास तीन महिन्यांचा अवधी : हरभरा व पोपटचे दर कडाडले

Turi priced at Rs 9,000; But what about farmers? | तुरीला ९ हजार रुपयांवर भाव; पण शेतकऱ्यांच्या पदरात काय?

Turi priced at Rs 9,000; But what about farmers?

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
धान पीक कापणीला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जुने धान व तूर शिल्लक नाही. नवीन तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आहे. अशातच भंडारा व तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचे दर ८,५०० ते ९,००० हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले आहेत. परंतु, सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नसल्याने बाजारात तुरीचे दर वाढून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नसल्याचे चित्र आहे.


जिल्ह्यात खरीप हंगामाच्या प्रारंभी सलग व धुऱ्यांवर शेतकरी तुरीची लागवड होते. जुलै महिन्यात लागवड केलेली तूर दुसऱ्या वर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती येते. हलक्या प्रतीची म्हणजेच अल्पमुदतीची तूर असल्यास डिसेंबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या पदरी पडते. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे जुनी तूर शिल्लक नाही. तसेच नवीन तूर हाती पडण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी आहे. आवक घटल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचे तसेच कडधान्यांचे दर वाढले आहेत.


हरभरा ७३००, पोपट ८ हजारांवर 
सध्या कडधान्याच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. रब्बी हंगामात निघणारा हरभरा सध्या ७३०० रुपयांवर, तर पोपट ८००० रुपयांवर विकला जात आहे. पोपट व हरभरा पिकाची लागवड होण्यास आणखी तीन महिन्यांचा अवधी असल्याने दोन्ही जिन्नसांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.


बारीक तांदूळ ५२३०, मध्यम ३९३० 
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या बारीक पोताच्या तांदळाला ५२३० रुपयांचा भाव आहे. मध्यम प्रतीचा तांदूळ प्रति क्विंटल ३९३० रुपयांनी विकला जात आहे. नवा तांदूळ बाजारात येताच दर कमालीने घटण्याचा अंदाज आहे


बाजार समितीत आवक नाही
नवीन तांदूळ अद्यापही बाजारात विक्रीस आलेला नाही. तसेच तुरीचे उत्पादन हाती येण्यास तीन महिन्यांचा अवधी आहे. हरभरा, पोपट, गहू आदींची पेरणी होण्यासही उशीर असल्याने सध्यातरी बाजार समितीत आवक नाही.


गतवर्षापेक्षा घटले सोयाबीनचे दर 
गतवर्षी हंगामात सोयाबीन पिकाला ४१०० रुपयांचा भाव मिळाला होता. परंतु, यंदा भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत ३८०० रुपयांचा भाव मिळत आहे. गतवर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे दर ३०० रुपयांनी घटले आहेत. गव्हास २४७० रुपयांचा भाव मिळत आहे.


कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढला 
जिल्ह्यात तूर पिकाची सलग लागवड कमी असून बांध्यांच्या धुऱ्यांवर अधिक प्रमाणात लागवड होते. सध्या वातावरणातील बदलामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. धानावर लष्करी अळीचा प्रकोप सुरू असून अन्य कीड व रोगांमुळे शेतकरी चिंतातुर आहेत. उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे


"सध्या बाजार समितीत कडधान्यांची आवक फारशी नाही. आवक नसल्याने तुरीसह अन्य धान्यांचे दर वाढले आहेत. सध्या हलके धान निघण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांतच तांदळाची आवक वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा भाववाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे." 
- सागर सार्वे, व्यवस्थापक बाजार समिती, भंडारा

Web Title: Turi priced at Rs 9,000; But what about farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.