तुरकर, वनवे, वासनिक, ठाकरे यांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:23 PM2018-01-28T22:23:24+5:302018-01-28T22:24:33+5:30
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीची निवडणूक रविवारला पार पडली. काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याने जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीची निवडणूक रविवारला पार पडली. काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याने जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने या निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही गट शेवटच्या क्षणाला एकत्र आले. ही निवडणूक निर्विरोध झाली. या निवडणुकीत प्रेम वणवे, रेखा वासनिक तर राष्टÑवादी काँग्रेसकडून धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे यांची सभापती पदी वर्णी लागली.
विषय समितीच्या महिला व बाल कल्याण समिती व समाजकल्याण विभागाचे सभापती यावेळी घोषित करण्यात आले. महिला व बालकल्याण सभापती पद हे राष्टÑवादी काँगे्रसच्या रेखा ठाकरे यांना तर समाजकल्याण सभापती पद काँग्रेसच्या रेखा वासनिक यांना देण्यात आले. प्रेम वणवे व धनेंद्र तुरकर यांच्या सभापतीपदाचे वाटप व्हायचे आहे.
५२ सदस्यीय संख्या असलेल्या जिल्हा परिषदेची विषय समिती सभापतीची निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी मंजूषा ठवकर, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी भूमिका निभविली. विषय समिती सभापती पदासाठी काँग्रेसअंतर्गत दोन गट आमनेसामने उभे ठाकले होते. दरम्यान दोन्ही गटातील सभापती पदासाठी इच्छुक जि.प. सदस्यांनी नामांकन दाखल केले होते. दोन्ही गटातील सदस्य नामांकन मागे घ्यायला तयार नव्हते. या अटीतटीच्या वेळी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक निरीक्षक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांची जिल्हा परिषद परिसरातच समजूत काढली. यानंतर वाघाये यांनी त्यांच्या गटातील सदस्यांना पक्षादेशानुसार नामांकन परत घेण्याचे आदेश दिले. शेवटच्या क्षणाला वाघाये यांच्याशी दिलजमाई झाल्याने काँग्रेसमधील वाद क्षमला. व सभापतीपदाची निवडणूक निर्विरोध पार पडली.
गटनेते पदामुळे नाराजगी
काँग्रेसच्या दोन अंतर्गत गटात सभापती पदासाठी रस्सीखेच सुरु होती. यावेळी काँग्रसचे निरीक्षक गुडधे पाटील हे भंडारात दाखल होवून त्यांनी दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दरम्यान काँग्रेस पक्षाकडून रहांगडाले ऐवजी निलकंठ टेकाम हे काँग्रेसचे गटनेते असून त्यांनी बजावलेल्या व्हीप नुसार मतदान करण्याच्या सुचना गुडधे यांनी दिल्या. याला माजी सभापती विनायक बुरडे यांच्यासह वाघाये गटाच्या सदस्यांनी प्रखर विरोध करुन टेकाम यांचे गटनेते पद मान्य नसल्याचे गुडधे यांना सुनाविले. मात्र वाघाये यांनी सदस्यांची नाराजगी दूर केल्यानंतर निवडणूक आटोपली.
प्रकृती अस्वस्थतेमुळे डोंगरे अनुपस्थित
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. आज झालेल्या समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी डोंगरे हे अनुपस्थित होते. त्यामुळे ५१ सदस्यांनी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला. दरम्यान सभापती पदासाठी नामांकन दाखल केलेल्या अन्य उमेदवारांनी त्यांचे नामांकन मागे घेतल्याने ही निवडणूक निर्विरोध झाली.
सर्व गट आले एकत्र
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने ताकत लावली होती. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळ जुडवून सत्ता काबीज केली. मात्र आज विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत हे गटातटाचे राजकारण कुठेही दिसून आले नाही. भाजपनेही यावेळी नामांकन दाखल केले नाही. तर काँग्रेससोबत असलेले शिवसेना व काही अपक्षांनी यावेळी त्यांच्या जुन्याच सहकारी गटासह हातमिळवणी करुन त्यांच्या बाजूने मतदानाचा कौल दिला.
‘बाऊन्सर’ला हाकलले
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ‘बाऊन्सर’चा वापर पहिल्यांदा वापरला. यानंतर आजच्या सभापती पदाच्या निवडणुकीतही बाऊन्सर चा वापर करण्यात आला. सर्व सदस्यांसह हे बाऊन्सर आज जिल्हा परिषद परिसरात दाखल झाले. त्यामुळे तेथे उपस्थित स्थानिक पोलीसांनी या बाऊन्सरला अक्षरश: हाकलून लावले.