मोहफुलातून कोट्यवधींची उलाढाल; मात्र भंडारा जिल्ह्यात एकही प्रक्रिया उद्योग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 01:33 PM2020-05-16T13:33:29+5:302020-05-16T13:33:49+5:30
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मोहवृक्ष हा कल्पवृक्षच आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल या वृक्षातून होत असते. त्यातील ९० टक्के फुलांचा वापर दारूसाठी होतो. या कल्पवृक्षाला राजाश्रय मिळाल्यास शासनाच्या महसुलात भर पडेलच, शिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा मोहवृक्ष हा कल्पवृक्षच आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल या वृक्षातून होत असते. त्यातील ९० टक्के फुलांचा वापर दारूसाठी होतो. या कल्पवृक्षाला राजाश्रय मिळाल्यास शासनाच्या महसुलात भर पडेलच, शिवाय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होईल.
दरवर्षी मार्च ते मे या कालावधीत मोहाच्या झाडाला फुले येतात. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यात ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. एका झाडापासून सुमारे ५० किलो फुले मिळतात. ही फुले साधारणत: २० ते २५ रुपये प्रती किलो दराने विकली जातात. एकट्या भंडारा जिल्ह्यात या झाडातून १०० टन फुलांचे उत्पादन होते. २५ रुपये प्रती किलोने हिशोब केला तर हा आकडा कोट्यवधीच्या घरात जातो. इतक्या प्रचंड प्रमाणात मोहफुलांचे उत्पादन होत असले तरी पूर्व विदर्भात त्यावर आधारीत एकही प्रक्रिया उद्योग नाही. राज्यात ऊस, द्राक्षांपासून दारू तयार केली जाते. त्या दारुला शासनाची मान्यता आहे. परंतु, हीच दारू मोहफुलापासून तयार केली तर त्याला शासनाकडून मान्यता मिळत नाही, हा विरोधाभास आहे. ग्रामीण भागात ज्यांच्याकडे उपजिविकेचे कोणतेही साधन नाही ते मोहफुलाच्या दारूचा व्यवसाय करतात. यात प्रामुख्याने महिलांचा समावेश असतो. घरात कर्ता पुरुष नसल्याने नाईलाजाने त्यांना हा व्यवसाय करावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. मोहवृक्षांचे संगोपण करण्यासाठी कुठलाही खर्च येत नाही. पावसाळ्याच्या पाण्यावरच ते वर्षभर जगतात. कोणतेही उत्पादन खर्च नसताना हा मोहवृक्ष शासनदरबारी दुर्लक्षितच आहे.
लॉकडाऊनमुळे वाढले मोहफुलाचे भाव
भंडारा जिल्ह्यात मोहफुलांचा वापर मुख्यत्वे दारु काढण्यासाठी केला जातो. साधारणत: २५ रुपये किलोप्रमाणे या फुलांची विक्री होते. परंतु, लॉकडाऊनमुळे देशी विदेशी दारुची विक्री बंद झाल्याने मद्य शौकींनाचा कल मोहफुलाच्या दारुकडे वळला. कधी नव्हे इतकी मोहफुलाच्या दारुची विक्री मागील दीड महिन्यात झाली. त्यामुळेच मोहफुलाचे दरही प्रचंड वाढविण्यात आले. २५ रुपये किलोप्रमाणे मिळणारे मोहफुल आता थेट ५० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. परिणामी, मोहफुलाच्या दारुचेही दर वाढले आहेत.
खाद्यान्नातून दारु निर्मितीची गरज
देशात आणखी काही वर्ष पुरेल एवढा अन्नसाठा आहे. अनेकदा गोदामांमध्ये अन्न सडत असते. परंतु, त्यावर प्रक्रिया केली जात नाही. विदेशात अन्नधान्यापासून रिफार्इंड दारुची निर्मिती केली जाते. परंतु, भारतात अन्नधान्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असूनही त्याकडे दुर्लक्ष आहे. गत पाच वर्षांपासून अन्नधान्याच्या किंमती स्थिर आहेत. बाजारात उठाव नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीला भाव मिळत नाही. त्यामुळे अन्नधान्यातून दारुची निर्मिती केल्यास शेतकऱ्यांच्या मालाला उठाव येईल व त्यातून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
बेरोजगारांना मिळणार रोजगार
भंडारा जिल्ह्यात उद्योगांची वाणवा असल्याने येथे बेरोजगारांची फौज आहे. हाताला काम नसल्याने बहुतांश युवक रेती तस्करी, अवैध दारु आदी कामात गुंतले आहेत. या जिल्ह्यात मोहफुलावर आधारीत उद्योगासाठी पोषक वातावरण असून लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मोहफुलावर उद्योगनिर्मिती झाल्यास बेरोजगारांनाही रोजगार मिळेल.
-चंद्रकांत खाडे, जिल्हा पणन अधिकारी भंडारा.