दूध खरेदीच्या दराने उलाढाल वाढणार

By Admin | Published: June 21, 2017 12:24 AM2017-06-21T00:24:15+5:302017-06-21T00:24:15+5:30

राज्य शासनाने गाईचे आणि म्हशीचे दूध खरेदीच्या दरात प्रति लिटर तीन रूपयांनी वाढ दिल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

The turnover of the milk procurement will increase | दूध खरेदीच्या दराने उलाढाल वाढणार

दूध खरेदीच्या दराने उलाढाल वाढणार

googlenewsNext

शेतकऱ्यांना दिलासा : दूध खरेदी दर वाढविण्याचा संघाचा मानस
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने गाईचे आणि म्हशीचे दूध खरेदीच्या दरात प्रति लिटर तीन रूपयांनी वाढ दिल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. जिल्ह्यात दूध उत्पादक सहकारी संघाशिवाय ११ खाजगी दुध खरेदी करणारे व्यापारी आहेत. याशिवाय सातशेच्यावर दूध संकलन केंद्र आहेत. सोमवारला राज्य सरकारने गाईच्या दुधाचा दर २४ रूपयांवरून २७ तर म्हशीच्या दुधाचा दर ३३ रूपयांवरून ३६ रूपये केला आहे. आता या खरेदी दराचा लाभ थेट शेतकऱ्यांना होणार आहे.
याशिवाय भंडारा जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या जिल्हा दुध संघात दररोज ४८ हजार लिटर दुधाचे संकलन होत असून या संघात ६१ कोटी ४४ लाख ६८ हजार ७५२ रूपयांची वार्षिक उलाढाल होते.
या संघातून मदर डेअरी, अमुल डेअरी, शासकीय दूध डेअरी आणि महानंदाला दूध पुरवठा करण्यात येतो. जिल्हा दूध संघ आणि खाजगी दूध संघ मिळून जिल्ह्यात दररोज २.४० ते २.५० लाख लिटरची दररोज खरेदी होते.

जिल्हा दूध संघाच्या तोट्यात घट
भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघ हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला होता. या संघाने सहकाराचे अनेक पुरस्कार पटकावले होते. परंतु मागील काळात या दूध संघाला अवकळा आली होती. ६० हजार लिटर दूध खरेदी करणारे हे दूध संघ १८ हजार लिटरवर घसरले होते. त्यानंतर सुनिल फुंडे यांच्या नेतृत्त्वात आलेल्या संघाने रामलाल चौधरी यांच्या मार्गदर्शनात या दूध संघात आता ५० हजार लिटर दररोज दूध संकलन होत आहे. मार्चमध्ये ७० हजार लिटर दूध संकलन पोहोचले होते.
११ खाजगी दूध संकलन केंद्र
भंडारा जिल्ह्यात तुमसरे डेअरी काटेबाम्हणी, भुरले डेअरी वाकेश्वर, एसव्हीके डेअरी पवनी, जैन डेअरी दवडीपार, दिनशॉ डेअरी भंडारा, वसंत डेअरी पालोरा, बंशी डेअरी लाखनी, रिलायंस डेअरी लाखनी, जर्सी डेअरी मोहाडी, साईअमृत डेअरी तुमसर आणि राहुल डेअरी राजेगाव अशा ११ डेअरी असून या डेअरीत १,९१,५०० लिटर दुधाची दररोज खरेदी होते.

दूध खरेदीसाठी खाजगी दूध डेअरीला शासनाचे निकष लावण्याची गरज आहे. खाजगी व्यापाऱ्यांमुळे दूध संघाला दर्जेदार दूध मिळणे अपेक्षित आहे तो मिळत नाही. शेतकऱ्यांना मिळणारा दूधाचा दर दूध संघाच्या दरापेक्षा कमी दराने मिळतो. खाजगी व्यापारी कमी प्रतिचा दूध खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. खाजगी व्यापारी कॅशलेस व्यवहार करीत नाही. व शासनाच्या निकषाप्रमाणे कोणतेही रेकार्ड ठेवत नाही. त्यामुळे या व्यवसायात कमिशनखोरी वाढली आहे. ती बंद झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळाला पाहिजे. शासनाने जाहीर केलेल्या दराप्रमाणे भंडारा दूध संघ २१ जूनपासून दूध उत्पादकांना दुधाचे दर देईल. भविष्यात दुधाचे दर वाढविण्याचा आमचा मानस आहे.
- रामलाल चौधरी, अध्यक्ष दूध उत्पादक सहकारी संघ भंडारा.
शासनाने दूध खरेदीच्या दरात केलेल्या वाढीचे स्वागत आहे. या खरेदी दराचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. जनावरांच्या पालन पोषणाचा खर्च वाढल्यामुळे यात आणखी वाढ देण्याची गरज होती.
- प्रमोद गभणे, अध्यक्ष, प्रमोद दूध संकलन केंद्र गणेशपूर.

Web Title: The turnover of the milk procurement will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.