तुमसर टाऊन रेल्वस्थानक आजही झाडाखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:48 AM2019-04-25T00:48:38+5:302019-04-25T00:49:03+5:30
देशाची जीवनवाहिनी रेल्वे असे ब्रिदवाक्य आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे तुमसर टाऊन रेल्वे स्थानकात प्रवाशांना २१ व्या शतकात भर उन्हात झाडाखाली रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाची येथे दुरवस्था झाली आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देशाची जीवनवाहिनी रेल्वे असे ब्रिदवाक्य आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे तुमसर टाऊन रेल्वे स्थानकात प्रवाशांना २१ व्या शतकात भर उन्हात झाडाखाली रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाची येथे दुरवस्था झाली आहे. सातपुडा पर्वत रांगेत चालणारी तुमसर-तिरोडी रेल्वे जागतिक वारसा स्थान घोषीत होऊ शकते. परंतु त्याकडे सातत्याने कायम दुर्लक्ष होत आहे. तिकीट विक्रीचा आधारावर सदर रेल्वेस्थानकाला ब दर्जा घोषित करुन मुलभूत सोयीसुविधा प्राप्त होऊ शकतात हे विशेष.
दक्षीण-पूर्व मध्य रेल्वेवर बिलासपूर- नागपूर विभागात तुमसर-तिरोडा रेलवे दरम्यान तुमसर टाऊन ब्रॉड गेज रेल्वेस्थानक आहे. तालुक्याचे स्थळ व महाराष्टÑ -मध्यप्रदेश राज्यांना रेल्वे मार्गाने जोडणारा प्रमुख रेल्वे मार्ग आहे. ब्रिटीशांनी मॅग्नीज वाहतुकीकरिता तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान रेल्वे ट्रॅक घातला होता. चिखला (भूमिगत), डोंगरी बु. (खुली) व मध्यप्रदेशातील तिरोडी येथे जगप्रसिध्द मॅग्नीज खाणी ब्रिटीशांनी शोधून काढल्या होत्या. मौल्यवान धातूंच्या ने-आण करण्याकरिता ही रेल्वे तयार करण्यात आली. आजही ही सेवा सुरुच आहे.
येथील गजबजलेली रेल्वेस्थानके आहेत. तुमसर टाऊन तालुका मुख्यालय आहे. तुमसर शहराच्या एका टोकाला (पश्चिमेला) ते आहे. ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाची इमारत आहे. येथे प्रवासी भर उन्हात रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करतात. सध्या उष्णतेची लाट सुरु आहे. तरी प्रवाशांची प्रचंड गर्दी या रेल्वे स्थानकावर दिसते. तिरोडी ते इतवारी (नागपूर) पर्यंत ही रेल्वेसेवा आहे. मुलभूत सोयीसुविधांचा या रेल्वे स्थानकावर अभाव आहे. रेल्वे सेवा स्वस्त व कमी वेळात स्थानावर पोहोचविणारी असल्याने प्रवाशी रेल्वेचा प्रथम प्राधान्य देतात. येथे भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. दिवसातून चारदा रेल्वेसेवा येथे पुरविण्यात आली आहे.
तिकीट विक्री भाडे तत्त्वावर
तुमसर टाऊन येथे रेल्वेतर्फे तिकीट विक्री होत नाही. तर मागील पाच ते सात वर्षापासून कंत्राटी पध्दतीने तिकीट विक्री करणे सुरु आहे. तुमसर टाऊन येथील तिकीट विक्री हा प्रमुख आधार मानुन रेल्वे नियमानुसार रेल्वेस्थानकाला ब दर्जा घोषित करण्याची गरज आहे. त्या आधारावर रेल्वे सुविधा प्रवाशांना येथे प्राप्त होऊ शकतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागपूर विभाग दक्षीण-पूर्व मध्ये रेल्वेत नफा मिळवून देणारा अव्वल विभाग आहे, हे विशेष.
तिरोडी-कटंगीचे अंतर केवळ १५.३६ किमी आहे. सन २०११-१२ मध्ये रेल्वे ट्रॅक बांधकामाला मंजुरी मिळाली होती. त्याकरिता ११९.३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु येथे कामे अत्यंत संथगतीने सुरु आहेत. मध्य भारतात जाणारा हा एकमेव रेल्वे मार्ग यामुळे होणार आहे. १२ हजार वृक्ष रेल्वे ट्रॅक दरम्यान येत आहेत. त्यापैकी ७ हजार वृक्ष आतापर्यंत कापण्यात आली. सातपुडा पर्वत रांगात हा रेल्वे ट्रॅक असल्याने पर्यावरणखात्याच्या अनंत अडचणी येथे येत असल्याची माहिती आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
जागतिक वारसा स्थान
सातपुडा पर्वत रांगातून जाणारा सुमारे ४५ किमी चा हा रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे तुमसर-तिरोडा रेल्वे मार्गाला जागतिक वारसा स्थान घोषीत होण्याची शक्यता अधिक आहे, परंतु त्या दृष्टीने प्रत्यन येथे कुणीच करतांना दिसत नाही. ही खरी शोकांतिका आहे.