निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप, दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:36+5:302021-07-17T04:27:36+5:30
भंडारा : दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाचे सूत्र घोषित केल्यानंतर ...
भंडारा : दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाचे सूत्र घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. निकालाचे सूत्र ३०-३०-४० टक्के यावर आधारित आहे. यात दहावीत ३० टक्के, अकरावीत ३० टक्के व बारावीत ४० टक्के, असे निकालाचे सूत्र आहे. तिन्ही मिळून विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. या निकालाच्या सूत्राने बारावीचे विद्यार्थी चिंता व्यक्त करीत आहेत. दहावीत कमी व त्यानंतर अकरावी व अंतर्गत मूल्यमापनात गुण वाढले असतील, तर त्याचा फटका बसू शकतो. सर्वच विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता सारखी नसते, याचाच फटका गुणवंत विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळेही त्यांची चिंता वाढली आहे.
बॉक्स
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा
दहावीत निकाल प्रथम श्रेणीत लागला होता. त्यानंतर मी अभ्यासाला लागलो. इयत्ता अकरावीत चांगले गुण होते. मात्र, आता यावर्षी परीक्षा झाली नाही. बोर्डाने दिलेल्या सूत्रानुसार निकाल लागणार असल्याने थोडीफार चिंता वाटत आहे.
-अनिल गोटेफोडे, विद्यार्थी
आता निकाल कधी लागणार याकडे माझे लक्ष लागले आहे. जे व्हायचे होते, ते झाले. मात्र, आता भविष्यावर लक्ष केंद्रित करून पुढील परीक्षा द्यायच्या आहेत, तरच मी यशस्वी होऊ शकते.
-समीक्षा चौधरी, विद्यार्थिनी
बॉक्स
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार
बारावीच्या निकालाचे सूत्र शिक्षण विभागाने ठरवून दिले आहे. दहावीचे ३० टक्के, अकरावी ३० आणि बारावीचे ४० टक्के, असे मिळून निकाल घोषित केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अवास्तव चिंता किंवा भीती मनात बाळगू नये.
-केशर बोकडे, प्राचार्य
बारावीचे वर्ष हे टर्निंग पॉइंट म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी आता भवितव्याकडे बघून पुढील परीक्षेची तयारी करायला हवी. गुणांचे गणित बिघडणार काय? अशी भीती बाळगू नये. जे आहे त्याला सामोरे जावे.
-अशोक पारधी, माजी मुख्याध्यापक