जिल्हा प्रशासनाच्या पत्राचा प्रवास बारा दिवसांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:32 AM2021-01-22T04:32:04+5:302021-01-22T04:32:04+5:30
मोहाडी - उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा कार्यालयातून मोहाडी तहसील कार्यालयात येणाऱ्या एका पत्राचा प्रवास बारा दिवसांचा झाला. ...
मोहाडी - उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा कार्यालयातून मोहाडी तहसील कार्यालयात येणाऱ्या एका पत्राचा प्रवास बारा दिवसांचा झाला. यावरून प्रशासन किती निष्काळजीपणे वागते त्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. एका सेकंदात इकडचे पत्र तिकडे होते, अशी माध्यमे उपलब्ध आहेत. परंतु, अजूनही प्रशासकीय पत्र घेऊन डाकसेवक जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात दररोज येत-जात असतात. त्यामुळे काही महत्वाची पत्रं प्रशासनाच्या आवक-जावक विभागात पडून राहतात, याचा प्रत्यय नुकताच आला. कान्हळगाव (सीरसोली) येथील ग्राम रोजगार सेवकांची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची माहिती भरण्याच्या कामाची संगणक चाचणी घेण्यात यावी, अशी तक्रार शासनाकडे करण्यात आली होती. याबाबतचे विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र शासनाकडून पृष्ठाकंन पत्र २५ नोव्हेंबर २०२० रोजीचे पत्र उपजिल्हाधिकारी (रोहयो) भंडारा यांना मिळाले. त्यांनी विशेष कार्य अधिकारी, रोजगार हमी मंत्र्यांचा संदर्भ देत ३१ डिसेंबर २०२० रोजी मोहाडी तहसील कार्यालयाला पत्र पाठवले. परंतु, ते पत्र तहसील कार्यालय, मोहाडी येथे १२ जानेवारीला आवकमध्ये आले. ते पत्र कान्हळगाव येथील तलाठय़ांना १५ जानेवारी रोजी देण्यात आले. त्यानंतर ते पत्र तक्रारकर्ता शंकर शेंडे यांना देण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी तक्रारी संबंधात ७ जानेवारी २०२०ला जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे तक्रारकर्त्याला दस्तऐवजासह उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, ती तारीख आधीच निघून गेली होती. पत्र मात्र तक्रारकर्त्याला तेरा दिवस उशिरा मिळाले. त्यामुळे संबधित पत्रावर सुनावणी होऊ शकली नाही. आता प्रश्न, पत्र उपजिल्हाधिकारी यांच्याकडून उशिरा पाठविण्यात आले की, मोहाडी तहसीलमध्ये तो पत्र पंधरा दिवस पडून होते, याचा तपास प्रशासनाने केला पाहिजे. तथापि, सहायक जिल्हाधिकारी व परिविक्षाधीन तहसीलदार मीनल करनवाल यांनी हे पत्र १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाला प्राप्त झाले तर तलाठय़ांनी १५ जानेवारी रोजी ते पत्र देण्यात आले, असे पत्रावर लिहून स्वाक्षरी केली आहे.