वीस वर्षांपासून २३ गावे तहानलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:45 AM2019-06-08T00:45:24+5:302019-06-08T00:45:49+5:30
तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले. आता उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे.
तुमसर तालुक्यात गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला २० वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली. या योजनेचे भूमिपूजन १९९८ मध्ये तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ही योजना ३३ कोटी रूपयांची होती. आता या योजनेतून काम होवून बरीच वर्ष लोटली. परंतु गोबरवाही परिसरातील २३ गावांना अद्यापही पाणीपुरवठा झाला नाही. ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे.
बावनथडी प्रकल्पाला जोडून गोबरवाही, पवनारखारी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला या परिसरातील आदिवासी बहुल गावांना पाणीपुरवठा केला जाणार होता. २० वर्षांचा मोठा कालखंड लोटूनही गावे तहाणलेलीच आहे. गतवर्षी लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र केवळ तीन महिनेच ही पाणीपुरवठा योजना सुरळीत राहिली. त्यानंतर ही योजना बंद पडली ती कायमची. येथे कंत्राटदार व शासनात आर्थिक व्यवहारात तफावत निर्माण झाल्याने पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहे. योजना पुर्णत्वात जावूनही गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. रात्री-बेरात्री महिलांना पाण्यासाठी जागावे लागते.
गावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. हातपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यातच अद्यापही जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे जलस्त्रोत कधी वाढणार आणि मुबलक पाणी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ गावातील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवणाºया या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते पंकज कारेमोरे यांनी केली आहे.
नियोजनाचा अभाव
२३ गावात भूमिगत जलवाहिनी, नळबांधणी, आलेसूर येथील जलशुद्धीकरण केंद्र, बावनथडी प्रकल्पात योजनेचे पंपहाऊस व इतर महत्वाची कामे करण्यात आली आहे. परंतु नियोजनाअभावी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यास अडचणी येत आहे. संबंधित विभागात नियोजनाचा अभाव दिसत असून याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे.