पुन्हा दोन आरोपी नागपुरातून गजाआड
By admin | Published: September 4, 2015 12:01 AM2015-09-04T00:01:29+5:302015-09-04T00:01:29+5:30
राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोन आरोपींना बुधवारला नागपुरातून अटक करण्यात आली.
नगरसेवक प्रशांत उके खून प्रकरण :
पाच आरोपींची नागपूर करागृहात रवानगी
तुमसर : राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोन आरोपींना बुधवारला नागपुरातून अटक करण्यात आली. अन्य एक आरोपी नागपूर कारागृहात हत्यार कायद्यांतर्गत बंदी असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
मोनु उर्फ कोमल संगम नागदेवे (२०) रा. आंबेडकर नगर, तुमसर हल्ली मुक्काम वैशाली नगर, नागपूर व शैलेश उर्फ सँडी लिलाधर रोडगे (२०) रा.आंबेडकर वॉर्ड तुमसर अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर नऊ हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता. पाच आरोपींना तुमसर पोलिसांनी दोन दिवसात अटक केली होती. यात निलेश भोंडे, अमोल मेश्राम, नागपूर, संतोष दहाट, सतीश डहाट, अमन नागदेवे सर्व रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर यांचा समावेश आहे. मृत्यूपूर्व बयानात नगरसेवक प्रशांत उके यांनी आठ-नऊ जणांनी हल्ला केल्याचे सांगितले होते. उके यांचा उपचारादरम्यान ३१ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला. हल्ल्यातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर चार आरोपी फरार होते. त्यानंतर तुमसर पोलिसांनी बुधवारी वैशाली नगर नागपूर येथून दोघांना अटक केली. एक आरोपी हत्यार कायद्यांतर्गत नागपूर कारागृहात बंदी आहे. उर्वरित एक आरोपी फरार असून त्याचे लोकेशन दूर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या दोन आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून २२ आॅगस्टपूर्वी अटक झालेल्या पाच आरोपींची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली. भंडारा कारागृहात तुमसर येथील दोन टोळीतील आरोपी असल्यामुळे भंडारा कारागृह अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने पाच आरोपींची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. तुमसरातील दोन टोळीतील आरोपी मागील काही महिण्यांपासून भंडारा कारागृहात आहेत. फरार एका आरोपींच्या शोधात तुमसर पोलिसांचे एक पथक गुरुवारला दुपारी रवाना झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)