दगडफेक प्रकरण भोवले; ठाणेदारापाठोपाठ आंधळगावचे दोन पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 04:13 PM2022-11-22T16:13:54+5:302022-11-22T16:14:11+5:30
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका
भंडारा : जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर दगडफेक केल्या प्रकरणात ठाणेदारापाठोपाठ आता आंधळगाव पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे १६ नोव्हेंबरच्या रात्री दगडफेकीत एकजण गंभीर जखमी झाला होता.
पोलीस शिपाई नवनाथ शिडणे आणि सचिन नारनवरे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर दोन दिवसांपूर्वी ठाणेदार सुरेश मट्टामी यांना निलंबित करण्यात आले होते. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर एका टोळक्याने दगडफेक केली होती. त्यात कामठी येथील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी शेखर बडवाईक याच्यासह आठजणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन दिवसांपूर्वी ठाणेदार सुरेश मट्टामी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी निलंबित केले होते. तर आता पोलीस शिपाई नवनाथ शिडणे आणि सचिन नारनवरे यांना निलंबित करण्यात आले आहे.
ठाणेदार मट्टामी यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी
आंधळगाव पोलीस ठाण्याचे निलंबित ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. होमगार्ड पुष्पजीत वाघमारे याच्या बँक खात्यावर एका व्यक्तीने जमा केलेले पैसे ठाणेदार मट्टामी व एका पोलीस शिपायाच्या बॅंक खात्यात पाठविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मट्टामी यांनी रामटेक तालुक्यातील देवलापार येथे जमीन खरेदी केली असून, अवैध व्यावसायिकांना हाताशी धरून खंडणी वसूल केली जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे.