तीन निलगाईंसह दाेन रानडुकरांची करंट लावून शिकार; दाेघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 12:46 PM2022-02-16T12:46:34+5:302022-02-16T12:48:17+5:30
वनविभागाने किटाळी जंगल परिसरात शाेध घेतला असता तीन निलगाई आणि दाेन रानडुक्कर मृतावस्थेत आढळले.
अड्याळ (भंडारा) : तीन निलगाई आणि दाेन रानडुकरांची विजेचा करंट लावून शिकार करण्याचा प्रकार अड्याळ वनपरिक्षेत्रातील किटाळी जंगल परिसरात मंगळवारी उघडकीस आला. वन्यप्राण्यांच्या मांस विक्रीतून या शिकारीचे बिंग फुटताच वनविभागाने दाेघांना अटक केली आहे.
विद्याधर खुशाल तिवाडे आणि चंद्रशेखर कैलास वाघधरे दाेघे रा. किटाळी ता. लाखनी असे अटकेतील शिकाऱ्यांची नावे आहेत. लाखनी जवळील सावरी येथे साेमवारी वन्यप्राण्यांची मांस विक्री हाेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरुन धाड मारली असता चंद्रशेखर वाघधरे याला वन्यप्राण्याच्या मांसासह अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचा एक सहकारी पसार झाला हाेता.
मंगळवारी वनविभागाने विद्याधर तिवाडे याला ताब्यात घेताच त्याने शिकारीची कबुली दिली. वनविभागाने किटाळी जंगल परिसरात शाेध घेतला असता तीन निलगाई आणि दाेन रानडुक्कर मृतावस्थेत आढळले. दाेन निलगाई आणि एका रानडुकराचे मांस गायब झाल्याचे दिसून आले. ही कारवाई उपवनसरंक्षक कुलराजसिंग, सहायक वनसंरक्षक आर. पी. राठाेड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्रअधिकारी आर. पी. गाेखले यांनी केली.
चितळाचे म्हणून विकत हाेते निलगाईचे मांस
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून शिकारीच्या घटनात वाढ झाली असून अनेक शिकारी सक्रीय आहेत. वन्यप्राण्यांची शिकार करुन गावांमध्ये त्याची विक्री केली जाते. अनेकदा चितळाचे मांस म्हणून निलगाईच्या मांसाची विक्री करतात. चितळाचे मांस म्हणून अनेकजण खरेदी करतात. मात्र किटाळी येथील दाेन शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर या प्रकाराचे बिंग फुटले.