मूलबाळ प्राप्तीचा दावा करणाऱ्या दोन ज्योतिषांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 02:54 PM2024-08-28T14:54:08+5:302024-08-28T14:54:58+5:30
लाखनीतील न्याय दंडाधिकाऱ्यांचा आदेश : मूलबाळ प्राप्तीचा दावा करणे भोवले
देवानंद नंदेश्वर / भंडारा
भंडारा : ज्यांना मूलबाळ होत नाही, त्यांना मूल प्राप्ती करून देण्याचा दावा करणारे पत्रक वाटून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या दोन ज्योतिषांना लाखनी येथील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग एफ. के. सिद्दिकी यांनी दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची व दहा हजारांची शिक्षा सुनावली. रामदास तुळशीराम वाईकर (३९) व रमेश दादाराम वाईकर (३४, दोन्ही रा. कारली, जि. यवतमाळ) अशी आरोपी ज्योतिषांची नावे आहेत.
लाखनी येथील एका लाॅजमध्ये रामदास वाईकर व रमेश वाईकर यांनी खोली भाड्याने घेतली. या दोन्ही ज्योतिषांनी स्वतःच्या नावाने पत्रके छापून ते लाखनी शहरात वाटले. यात कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी लाॅजमध्ये येऊन संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.
सदर पत्रक लाखनी येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी अश्विनी दिलीप भिवगडे यांना मिळाले. त्यांनी याबाबतची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे जिल्हा प्रधान सचिव विष्णुदास लोणारे यांना दिली. यानंतर अश्विनी भिवगडे, विष्णुदास लोणारे, प्रशांत रामटेके लाॅजमध्ये ज्योतिषांना भेटले. तेव्हा ज्योतिषी रामदास वाईकर व रमेश वायकर यांना भिवगडे यांनी त्यांच्या लग्नाला सोळा वर्षे झाली असून, मूलबाळ होत नाही असे सांगितले. तेव्हा या ज्योतिषांनी येत्या पंधरा महिन्यात तुम्हाला मूलबाळ होईल, त्याकरिता तुम्हाला पूजा करावी लागेल. पूजेसाठी साहित्य लागेल, असे सांगितले त्यावेळी ५० रुपये नगदी घेऊन सर्व साहित्य दुसऱ्या दिवशी घेऊन येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
पोलिसांनी धाड घालून लाॅजमधून पूजेचे साहित्य जप्त केले. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३चे कलम ३ (२) सह कलम ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करून ज्योतिषी रामदास वाईकर, रमेश वाईकर यांना अटक केली. प्रकरण लाखनी येथील न्यायालयात चालले. या प्रकरणात पाच जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सहायक अभियोक्ता पी. आर. लिंगायत यांनी बाजू मांडली.